
सातारा : केसकरवाडीच्या सुपुत्राची अमेरिकेत भरारी
नागठाणे - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी घालताना एका छोट्या वाडीतील सुपुत्र अमेरिकेतील नामांकित कंपनीत कार्यकारी संचालक बनला आहे. शेतकरी कुटुंब, प्राथमिक शाळेत शिक्षण, त्यासाठीची पायपीट, सायकलीचा प्रवास या साऱ्यांतून हे यश आणखी चमकदार बनले आहे.
अनंत पार्टे यांची ही यशोगाथा. मेढ्यालगत असलेले केसकरवाडी (ता. जावळी) हे त्यांचे गाव. वडील कोंडीराम अन् आई जनाबाई या शेतकरी दांपत्याचे हे पुत्र. तिथल्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते शिकले. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी केसकरवाडीतच पूर्ण केले. दहावीचा टप्पा त्यांनी साताऱ्यातील भवानी हायस्कूलमध्ये पूर्ण केला. तिथे एल. बी. खंडागळे, आर. बी. शेख, आर. एन, गोडसे, एस. एन. चव्हाण या शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरले. दहावीनंतर सातारा पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी पदविका संपादन केली. पुढे ते बी. टेक. झाले. नंतर त्यांनी मुंबईत एम. टेक. चे शिक्षण पूर्ण केले. मग मुंबईतीलच एका खासगी कंपनीत नोकरीचा श्रीगणेशा केला. सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, विभागप्रमुख अशी एकेक पदे त्यांनी पादाक्रांत केली. या कामी बंधू बाबासाहेब अन् पत्नी मेधा यांची सोबत महत्त्वपूर्ण ठरली. २०१७ पासून ते अमेरिकत कार्यरत आहेत. करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या एका कंपनीत त्यांची संचालकपदी वर्णी लागली आहे. एवढे उत्तुंग यश पटकावूनही त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत. ते मित्रांशी गप्पागोष्टी करतात. ‘गेट-टुगेदर’च्या कार्यक्रमास उपस्थिती लावतात, असे मित्र शेखर राऊत, रियाज शेख, नितीन दुदुस्कर, संतोष देशमुख यांनी नमूद केले. वर्षातून अधूनमधून ते गावी येतात. गावातील सार्वजिक कार्यक्रमात सहभागी होतात. विविध माध्यमांतून मदत करतात.
साताऱ्याचा कायम अभिमान
अनंत यांच्या नावावर १२ पेटंट आहेत. आपली माती असो, केसकरवाडी असो, वा साताऱ्याची भूमी असो, प्रत्येक गोष्टीचा अभिमान त्यांच्या मनात कायम घट्ट आहे. त्यातून त्यांनी अमेरिकेतील आपल्या चारचाकी वाहनाचा क्रमांक ‘सातारा’ असा घेतला आहे.