Khambatki Ghat : खंबाटकीसाठी रविवार ठरतोय ‘ब्लॉक डे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khambatki Ghat traffic on holidays satara pune travel

Khambatki Ghat : खंबाटकीसाठी रविवार ठरतोय ‘ब्लॉक डे’

खंडाळा : रविवार आला, सलग सुटी आली? की खंबाटकी घाट जाम होणारच, हे आता समीकरणच बनले आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे सातारा- पुणे प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांचीही आता तशी मानसिकता बनत आहे.

याला कारण ही तसेच आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक रविवारी खंबाटकी घाट जाम झालाच आहे. वांरवार चक्का जाम होत असल्याने वाहनचालकांसाठी रविवार हा ‘ब्लॉक डे’ ठरत आहे.

सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाच किलोमीटरचा खंबाटकी घाट आहे. पुण्याच्या बाजूला जाताना बोगदा व एस आकाराचे धोकादायक वळण आहे. साताऱ्याकडे येताना सात किलोमीटरचा घाट रस्ता असून, त्यात सहाव्या वळणापासून दोन लेनचा रस्ता आहे.

अशा विविध अडचणीत असणाऱ्या या खंबाटकी घाटात वाहनचालकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तेथील वाहतूक कोंडी चर्चेचा व चिंतेचा विषय बनला आहे. नातळदिवशी २५ डिसेंबरला (रविवारी) सकाळी सात वाजल्यापासून नऊ तास घाट रस्ता जाम होता. त्यानंतरच्या रविवारीही (१ जानेवारीला) घाटात वाहतूक कोंडी झाली होती.

आठ जानेवारीला (रविवार) कंटेनर पेटल्याच्या घटनेमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यानुसार प्रत्येक रविवारी व सलग सुट्या असल्यावर खंबाटकी घाट जाम होत आहे. वाहतूक कोंडी होण्याची कारणे शोधली असता त्यात प्रामुख्याने पुण्याकडे जाताना राष्ट्रीय महामार्ग तीन लेनचा आहे.

मात्र, खंबाटकीचा बोगदा दोन लेनचा आहे. बोगद्यामध्ये डांबरीकरण नाही, वीज नाही. सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काम सुरू असल्याने बोगदा ते जुना टोलनाक्यापर्यंत रस्त्याचं काम सुरू असलेल्या मार्गावर दोनच लेनवरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कंटेनरच्या लाइनसह व कार, इतर वाहनांच्या ठरलेल्या वाहनांच्या होणाऱ्या लेन बदलामुळे वारंवार वाहतूक विस्कळित होते.

वाहनांच्या रांगा लागल्यावर घाट चढताना अनेक वाहनांचे इंजिन तापून गरम झाल्याने ती वाहने जाग्यावरच बंद पडतात. २५ डिसेंबरच्या वाहतूक कोंडीत घाट चढताना सुमारे १०० वाहने बंद पडली. त्यामुळे क्रेनच्या साह्याने त्यांना बाजूला करून वाहतूक पूर्ववत करताना पोलिसांची कसरत झाली. घाटात वारंवार कंटेनर बंद पडत असल्यामुळे तेथे शासनाच्या मालकीची क्रेन आवश्यक आहे. खासगी क्रेनच्या भाड्यावरून अनेकदा वाद होताना दिसतो.

आठ जानेवारीला कंटेनरला आग लागून दोन कोटी रुपये नुकसान झाले. या घटनेवेळी अग्निशमन यंत्रणा नसल्याने मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. वाई पालिका, किसन वीर कारखाना यांच्या अग्निशमन यंत्रणेवर, तसेच एशियन पेंन्टसच्या खासगी अग्निशामक यंत्रणेवर अवलंबून राहावे लागले. ते उशिरा पोचल्याने वाहतूक कोंडी होतच राहिली.

शनिवारी सातारा व महाबळेश्वरकडे जाणारी वाहने अधिक असतात. महाबळेश्वरकडून माघारी पुण्याकडे जाणारी वाहतूक पाहता पुण्याकडे बोगदामार्गे जाणारी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या दिवशी एनएचआयने त्यादृष्टीने कामाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

यासंबंधी स्थानिक पोलिस प्रशासनाला अवगत करणे आवश्‍यक आहे. या दिवशी तेथे वाहतूक पोलिसांची संख्याही वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी तेथे पोलिस, मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे.

खंबाटकीत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर यासारख्या अनेक उपाययोजनांचा तुटवडा आहे. त्यामुळे सलग सुट्या असो किंवा रविवार खंबाटकी घाट ब्लॉक होत आहे. वाहनधारक, प्रवाशांना दिवसभर अथवा नऊ- नऊ तास वाहतूक कोंडीत अडकून ठेवण्यापेक्षा संबंधित विभागाने यात लक्ष घालून ठोस उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.