
गेल्या तीन दिवसांपासून श्री खंडोबा मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. भाविकांच्या उपस्थितीने पिवळीधमक होणारी पालनगरी यावर्षी सुनीसुनी दिसून येत आहे.
उंब्रज (जि. सातारा) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज (ता. 25) पाल येथे होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा भाविकांशिवाय होणार आहे. देवाचे सर्व धार्मिक विधी, रूढी व परंपरा प्रमुख मानकरी व गावातील काही मानकऱ्यांच्या उपस्थितीत होतील. दरम्यान, पाल येथे यात्रेच्या पूर्वसंध्येला सर्वत्र शुकशुकाट होता.
यावर्षी मुख्य मिरवणूक रथाऐवजी खुल्या जीपमधून निघेल. मिरवणुकीमध्ये मानकरी तसेच गावातील काटे-देशमुख यांचा मानाचा गाडा, छत्रीधारक मानकरी, गावातील सासनकाठी, पालखी, देवाचा कारखाना अशी निवडक मानकरी मंडळी सहभागी होतील. मात्र, या वर्षी जिल्हा व परजिल्ह्यातील मानकरी, मानाचे गाडे, कोल्हापूर येथील चोपदार यांचा घोडा यांच्यासह भाविकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने सर्वत्र नाकाबंदी केली आहे. यात्रेदरम्यान भाविकांनी व मेवामिठाईच्या दुकानांनी नेहमी गजबजणारे तारळी नदीचे वाळवंट पूर्णतः रिकामे आहे. गेल्या तीन दिवसांपासून श्री खंडोबा मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. भाविकांच्या उपस्थितीने पिवळीधमक होणारी पालनगरी यावर्षी सुनीसुनी दिसून येत आहे.
शेतक-याने दिला जून्या परंपरेला उजाळा; वाणवसासह लाडक्या लेकीची पाठवणी केली बैलगाडीतून
देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना घरबसल्या श्री खंडोबा व म्हाळसा यांचा मंदिरातील सर्व धार्मिक विधी तसेच विवाह सोहळा लाइव्ह पाहण्यासाठी फेसबुक लाइव्ह तसेच यु ट्यूबची लिंक प्रसारित केली आहे. या लिंकच्या माध्यमातून श्री खंडोबाचे दर्शन व इतर विधी थेट पाहावेत, असे आवाहन देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील व उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे. भाविकांंनी साेहळा पाहण्यासाठी क्लिक करावे : https://youtu.be/90YxiT4wDpw
Edited By : Siddharth Latkar