
'इथं' झाली राज्यातील पहिली विधवा प्रथामुक्ती; ग्रामसभेत निर्णय अन लगेच कार्यवाही
गोंदवले - ग्रामसभेत केवळ निर्णय घेऊन न थांबता प्रत्यक्षात विधवा प्रथा बंद करण्यात किरकसाल (ता. माण) गावाने यश मिळविले. प्रत्यक्षात कार्यवाही करून विधवा प्रथामुक्त गाव म्हणून राज्यात नावलौकिक मिळविणारे हे पहिले गाव ठरले आहे.आज झालेल्या ग्रामसभेत विधवांना हळदी कुंकू लावून मानाचा हिरवा चुडा भरण्यात आला. यावेळी सर्वांच्याच डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले.
ग्रामविकासाचा ध्यास घेऊन एकवटलेल्या किरकसाल गावाने आजच्या विशेष ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय घेतला.या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा कुंभार होत्या.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी डी बी भोसले, अमोल काटकर,पोलीस पाटील दत्तात्रय रसाळ, उमेदच्या समन्वयक दिपाली मासाळ,कृषी सहाय्यक प्राची निकाळजे,सुनील काटकर,निवृत्ती काटकर,ग्रामसेवक विकास गायकवाड यांच्यासह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड येथील ग्रामपंचायतीने पहिल्यांदा अनिष्ट विधवा प्रथाबंदी बाबत ठराव करण्यात आला होता.या निर्णयाचे स्वागत करून शासनाने संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी करण्यासाठी पाऊल उचलले आहे.त्यानुसार किरकसाल गावाने ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत चर्चा करून विशेष ग्रामसभा बोलाविली होती.तत्पूर्वी विधवा प्रथाबंदी करण्याबाबत गावातील महिला व पुरुषांकडून चाचपणी करण्यात आली होती.सर्वच स्तरातून सकारात्मक प्रतिसाद आल्याने आजच्या ग्रामसभेत चर्चा करण्यात आली.यावेळी अमोल काटकर यांनी विधवा प्रथाबंदी बाबत चर्चा करून ठराव मांडला.या ठरावाला सर्वांनी हात वर करून संमती दिली. इतकेच नव्हे तर उपस्थित विधवांना सरपंच शोभा कुंभार यांनी हळदी कुंकू लावून हिरव्या बांगड्या भरल्या.पती निधनानंतर पहिल्यांदाच कपाळावर कुंकवाचा टिळा लावताना महिला भावुक झाल्या होत्या.या भावनिक वातावरणाने सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
विधवा प्रथा बंद झाल्याने या ऐतिहासिक समारंभात उपस्थितांनी या महिलांना आदराचे स्थान देण्याचे व सर्व समारंभांमध्ये सामावून घेण्याची शपथ घेतली.
सहाय्यक गटविकास अधिकारी भोसले म्हणाले,विधवा होणे ही त्या महिलेची चूक नाही. त्यामुळे ही अनिष्ट रूढी सर्वत्र बंद होणे आवश्यक आहे.शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून विधवा महिलांच्या विकासासाठी तरतूद करावी.
विधवांना सन्मान देण्यासाठी माझ्या मुलीच्या लग्नात नवरीला हळदी लावण्याचा पहिला मान विधवांना देणार असल्याची ग्वाही माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अमोल काटकर यांनी यावेळी दिली.
आमच्या गावात विधवा प्रथाबंदी झाल्याने माझ्यासारख्या महिलांना समाजात पुन्हा मानसन्मान मिळणार असल्याचे खूप समाधान आहे.
- प्रतिभा तुपे, किरकसाल
आम्ही ग्रामसभेत फक्त निर्णय घेऊन थांबलो नाही तर प्रत्यक्ष कृती करून किरकसाल गाव विधवा प्रथा मुक्त केल्याचा अभिमान आहे.
- शोभा कुंभार, सरपंच, किरकसाल
Web Title: Kirkasal Village First Widows Emancipation In State Decision Was Taken Immediately In Gramsabha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..