स्फोटकांची वाहतूक करताना सातारा, राजस्थानातील दोघांना अटक; दहशतवादविरोधी पथकाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koregaon Police

तपासणी केली असता गाडीत जिलेटिनच्या एक हजार ६०० कांड्या आढळून आल्या.

स्फोटकांची वाहतूक करताना सातारा, राजस्थानातील दोघांना अटक

कोरेगाव : सातारा येथील दहशतवादविरोधी पथक व कोरेगाव पोलिसांनी (Koregaon Police) स्वतंत्रपणे दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत स्फोटक पदार्थ जिलेटिनच्या कांड्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून जीप, दुचाकी, जिलेटिनच्या एकूण दोन हजार कांड्या असा मुद्देमाल जप्त केला आहे.

एका प्रकरणात संतोष हिंदुराव पवार (रा. धावडशी, ता. सातारा), तर दुसऱ्या प्रकरणात राजू बालोजी डोली (रा. जागेद्री, जि. भिलवाडा, राजस्थान) या दोघांना अटक झाली आहे. सातारा येथील दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष साळुंखे, हवालदार हणमंत भोसले, पोलिस नाईक सागर भोसले, सुमित मोरे यांनी काल (ता. ९) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास शेंदूरजणे (ता. कोरेगाव) हद्दीत निघालेली जीप अडवली. चालक संतोष पवार याच्याकडे चौकशी करून तपासणी केली असता गाडीत जिलेटिनच्या एक हजार ६०० कांड्या आढळून आल्या. त्याच्याकडे या मालाच्या खरेदी-विक्रीच्या पावत्या, वाहतुकीचा परवाना, गाडीची कागदपत्रे नसल्याचेही निदर्शनास आले. हा माल सातारा येथे घेऊन जाण्यास शेरखान अल्लाबलो मन्सुरी (रा. सातारा) याने सांगितल्याची माहिती चालक संतोष पवार याने दिली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करून त्याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे तपास करत आहेत.

हेही वाचा: निवडून येताच उदयनराजेंनी गाठला सुरुची बंगला; भावाचे मानले 'आभार'

दुसऱ्या प्रकरणात पोलिस निरीक्षक मोरे, उपनिरीक्षक कदम, सहायक फौजदार केशव फरांदे, साहिल झारी यांनी काल रात्री दहाच्या सुमारास भाटमवाडी (ता. कोरेगाव) येथे कारवाई केली आहे. देवा बेरवा व राजू बालोजी डोली (दोघेही रा. जागेद्री, जि. भिलवाडा, राजस्थान) हे दोघे दुचाकीवरून निघाले होते. अडवून चौकशी केली असता त्यांच्याकडे जिलेटिनच्या एकूण ४०० कांड्या आढळून आल्या. या मालाच्या बॉक्सवरील बॅच क्रमांक, उत्पादन तारीख, प्रॉडक्ट कोडबाबतची माहिती जाणूनबुजून काढून टाकून संशयास्पदपणे या स्फोटकांची वाहतूक करताना ते दोघेही आढळून आले. त्यांच्यापैकी एक जण पळून गेला, तर राजू बालोजी डोली यास अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक राऊत तपास करत आहेत.

loading image
go to top