
Kaleshwari Mata Yatra : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान : कुसुंबीची काळेश्वरी माता
- विश्वनाथ डिगे
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुसुंबी येथील काळेश्वरी मातेची यात्रा ८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. रात्री देवीचा छबिना झाला. या छबिन्यास हजारो लोकांची उपस्थिती होती. यात्रेचा मुख्य दिवस संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज (ता. ९) आहे. यानिमित्त...
इतिहासाची साक्ष देणाऱ्या जावळी तालुक्यात कुसुंबी हे गाव वसले असून, कुसुंबीस अत्यंत निसर्गरम्य असे वातावरण लाभले आ5हे. सह्याद्रीच्या कुशीत आणि वेण्णामाईच्या तीरावर बसलेल्या कुसुंबीच्या काळेश्वरीमातेची ख्याती महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर देखील प्रख्यात झालेली आहे. त्यामुळेच मातेच्या दर्शनासाठी कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा इत्यादी राज्यांतून भाविक येत असतात. याबरोबरच कुसुंबी गाव आता नाचणीचे गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध होत आहे.
श्री क्षेत्र कुसुंबी हे गाव जावळीचे मुख्यालय असलेल्या मेढ्यापासून सात किलोमीटर अंतरावर आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या साताऱ्यापासून २७ किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी काळेश्वरी मातेचे मंदिर हे अत्यंत साध्या कौलारू पद्धतीचे होते. सन १९८७ मध्ये मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार धुंदीबाबा यांच्या हस्ते संपन्न झाला. मातेचे मंदिर हे पूर्वाभिमुखी असून, मंदिरात गेल्यावर कुसुंबी काळेश्वरी मातेच्या उजव्या बाजूस मातेची थोरली बहीण असलेल्या मांढरदेवी तर डाव्या बाजूस वाकणच्या काळूबाईची मूर्ती आहे. याबरोबरच मंदिरात दुर्गादेवी, भैरवनाथ, केदारनाथ, रुद्राई देवी आदी. देवदेवतांच्या मूर्तींची स्थापना केलेली आहे. कुसुंबीचे मूळ ग्रामदैवत हे केदारनाथ असून, केदारनाथ देवाने मातेस राक्षसांचा संहार करण्यासाठी देवीस कुसुंबीत अवतार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे देवीने कुसुंबी गावात आपले वास्तव्य केले.
वर्षभरात काळेश्वरी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. प्रामुख्याने यात्रा व नवरात्रोत्सव काळात मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते, तर अमावास्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी देखील अनेक भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात. काळेश्वरी मातेची यात्रा माघ शुद्ध पौर्णिमेस सुरू होते. देवीची ध्वजकाठी उभारून यात्रेस प्रारंभ होतो. यानंतर देवीचा रुद्राभिषेक, छबिना, मुख्य यात्रा असे एकूण पाच देवीची यात्रा भरते.
पूर्वी यात्रेला पशुहत्या व्हायची मात्र मांढरदेव येथे दुर्घटना घडल्यानंतर कुसुंबीत देखील पशुहत्या बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. काळेश्वरी मंदिरातील सुधारणा, देखभाल तसेच नियंत्रणासाठी काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट काम करीत असून, या ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर परिसरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या राहण्याची सोय व्हावी, याकरिता भक्तनिवास, मंदिराची जागा अपुरी होती, ती वाढविण्यासाठी मंदिरासमोर मोठा स्लॅब टाकून मंदिराचे प्रांगण प्रशस्त करण्यात आले आहे.