esakal | आश्‍लेषा नक्षत्रात संततधार; कऱ्हाडातील या भागातील तलाव तुडुंब
sakal

बोलून बातमी शोधा

karad

काही नक्षत्रांत पाऊस कमी-जास्त पडला. मात्र, गेल्या आठवड्यापासून आश्‍लेषा नक्षत्राचा सतत संततधार, तर कधी धो-धो पाऊस पडत असून डोंगरांना पाझर फुटले आहेत. डोंगर पाझरू लागल्याने ओहळ, ओढे, शेततळी व नाले तुडुंब भरून वाहू लागले. 

आश्‍लेषा नक्षत्रात संततधार; कऱ्हाडातील या भागातील तलाव तुडुंब

sakal_logo
By
जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) ः दक्षिणेतील डोंगरी भागात गेल्या आठवड्यापासून संततधार पडणाऱ्या पावसाने डोंगरी भागाचा पावसाचा बॅकलॉग भरून काढला असून येणपे, उंडाळे, घोगाव व जिंती तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत. 

मॉन्सूनच्या सुरवातीला मृग नक्षत्रात पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. या पावसाने पिकांची उगवण झाली व डोंगरी भागाने हिरवाईचा शालू परिधान केला. मात्र, दरम्यानच्या काळात मॉन्सूनच्या पावसाने दडी मारली व चक्रीवादळ होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने पुन्हा मुसंडी मारली. त्यामध्ये पावसापेक्षा वादळी वाऱ्याने ऊस पीक शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ऊस अक्षरशः भुईसपाट झाले, तर मका व इतर कडधान्यांची हानी झाली. 

काही नक्षत्रांत पाऊस कमी-जास्त पडला. मात्र, गेल्या आठवड्यापासून आश्‍लेषा नक्षत्राचा सतत संततधार, तर कधी धो-धो पाऊस पडत असून डोंगरांना पाझर फुटले आहेत. डोंगर पाझरू लागल्याने ओहळ, ओढे, शेततळी व नाले तुडुंब भरून वाहू लागले. डोंगरी भागासाठी वरदायी असणारे येणपे, उंडाळे, येळगाव, घोगाव, जिंती तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत. येवती तलाव भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. 

हा पाऊस भात, सोयाबीन, भुईमूग व इतर कडधान्य पिकांच्या वाढ व भरण्यासाठी उपयुक्त असल्याने शेतकरी सुखावला असला तरी एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू पाहावयास मिळत आहेत. वादळी वाऱ्यामुळे ऊस पीक शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. एकंदरीत गत आठवड्यापासून संततधार पडणाऱ्या पावसाने कऱ्हाड दक्षिणेतील डोंगरी भागाचा बॅकलॉग भरून काढल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

तब्बल 166 वर्षांपासून या गावात एक गणपतीची परंपरा 

loading image
go to top