बनपुरी डोंगरावर घुमला 'चांगभलं'चा गजर; दर्शनासाठी महाराष्ट्र-कर्नाटकातून भाविकांचा ओघ

राजेश पाटील
Sunday, 22 November 2020

बनपुरी येथे चैत्रात होणारी श्री नाईकबा देवाची यात्रा आणि त्यानंतरही पाच रविवारी यात्रेचाच भास निर्माण करणाऱ्या पाकळण्या यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द कराव्या लागल्या. मार्चपासून मंदीरही बंदच ठेवल्याने भाविकांचा ओघ पूर्णपणे थांबला होता. डोंगरमाथ्यावर आठ महिन्यांपासून सन्नाटा होता.

ढेबेवाडी (जि. सातारा) : श्री क्षेत्र नाईकबाचा डोंगर माथा तब्बल आठ महिन्यानंतर "चांगभल'च्या गजराने दणाणून निघाला. मोठ्या प्रतीक्षेनंतर मंदीर खुले झाल्याने दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला असून आज तर तेथे जणू भक्तीचा सागर अवतरल्याचाच भास होत होता. 

बनपुरी येथे चैत्रात होणारी श्री नाईकबा देवाची यात्रा आणि त्यानंतरही पाच रविवारी यात्रेचाच भास निर्माण करणाऱ्या पाकळण्या यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द कराव्या लागल्या. मार्चपासून मंदीरही बंदच ठेवल्याने भाविकांचा ओघ पूर्णपणे थांबला होता. डोंगरमाथ्यावर आठ महिन्यांपासून सन्नाटा होता. बंदमुळे तेथे विविध व्यवसायांवर उपजीविका असलेल्या अनेक कुटुंबांसमोरही बिकट प्रश्न उभा राहिला होता. अलीकडे नवरात्रोत्सवात परंपरेनुसार महाराष्ट्र व कर्नाटकातून दर्शनास आलेल्या अनेक भाविकांनाही पोलिसांनी डोंगर पायथ्यालाच अडवून माघारी पाठवले होते. आता राज्यातील मंदीरे खुली केल्याने श्री नाईकबा देवाच्या दर्शनासाठी पुन्हा गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. आज तेथे भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. 

मंत्र्यांनीसुद्धा घरुनच विठूरायाची पूजा करावी; अक्षयमहाराजांचा उपमुख्यमंत्र्यांना इशारा

भाविकांना दर्शन रांगातून मंदिरात प्रवेश दिला जात होता. सॅनिटायझरची व्यवस्थाही केलेली होती. ध्वनिक्षेपकावरून आवश्‍यक सूचनाही दिल्या जात होत्या. मात्र, सोशल डिस्टनसिंगबाबत भाविकांमध्ये फारशी जागरूकता दिसून आली नाही. परिसरात पोलीस यंत्रणाही बघायला मिळाली नाही. उपलब्ध तोकड्या यंत्रणेवरही गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. या ठिकाणी ऑनलाईन दर्शनाची सुविधा नाही. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large Crowd Of Devotees To Visit God At Banpuri Satara News