दिवाळी खरेदीसाठी साताऱ्यात दुकानं हाउसफुल्ल; ग्राहकांची ब्रॅंडेड कपड्यांना पसंती

दिलीपकुमार चिंचकर
Wednesday, 11 November 2020

सध्या युवक आणि युवतींत ब्रॅंडेड तयार कपडे खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. त्यामुळे लिनन, कॉटन कॅंडी अशा विविध कंपन्यांच्या पॅंट आणि शर्टला ग्राहक वाढले आहेत. तरुणांचा ओढा जास्त जीनकडेच असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. काही नामवंत कंपन्यांनी पॅंट-शर्ट कापडाचे कोंबो पॅक माफक किमतीत बाजारपेठेत आणले आहेत.

सातारा : "ऑनलाइन' खरेदीकडे वळू लागलेले ग्राहक आपल्या कपड्यांच्या दालनात यावेत, यासाठी येथील कापड, तसेच रेडिमेड विक्रेत्यांनी जय्यत तयारी केली आहे. यामुळेच दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांच्या गर्दीने फुलून जाऊ लागली आहे. नामवंत ब्रॅंडची कपडे, रंग, पोत आणि आकर्षक डिझाईनच्या साड्यांनी दालने भरून गेली आहेत. 

दिवाळी म्हटले, की नवी कपडे हवीतच. यामुळे दिवाळीसाठी पहिली खरेदी किराण्याबरोबर कपड्यांचीच होते. त्यात अगदी आबालवृद्धांचा समावेश असतो. मात्र, प्राधान्य असते ते बालचमू आणि महिला वर्गाला, तसेच युवावर्गही दिवाळीत आवर्जून खरेदीसाठी दुकानात जातात. दिवाळी कपडे आणि किराणा ही प्रत्येक कुटुंबातील मोठी खरेदी असते. त्यामुळे कपड्याच्या दुकानात आता गर्दी वाढू लागली आहे. सध्या युवक आणि युवतींत ब्रॅंडेड तयार कपडे खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. त्यामुळे लिनन, कॉटन कॅंडी अशा विविध कंपन्यांच्या पॅंट आणि शर्टला ग्राहक वाढले आहेत. तरुणांचा ओढा जास्त तो जीनकडेच असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. काही नामवंत कंपन्यांनी पॅंट-शर्ट कापडाचे कोंबो पॅक माफक किमतीत बाजारपेठेत आणले आहेत. सर्वसाधरणपणे जीन पॅंट 450 ते 1500, शर्ट 410 ते 1200, टी शर्ट 200 ते 600, कुर्ते 350 ते 1200, लेगीज 130 ते 340, नेहरू शर्ट पायजमा 300 ते 600 पर्यंत उपलब्ध आहेत. 

लहान मुलांच्या कपड्यांत फारसे नवे काही नाही. मात्र, जीन पॅंट शर्ट आणि विविध प्रकारचे आकर्षक चित्रे असलेल्या "रीच' टी शर्टला पालक आणि कळते बालचमू प्राधान्य देत आहेत. पायजमा कुर्तीसह खादीपासून सिल्कपर्यंत आणि चांगली "स्ट्रेच' असलेल्या लेगीजकडे युवतींचा ओढा आहे. ड्रेस मटेरियल घेऊन ते शिवण्यापेक्षी युवती विविध फॅशनचे तयार ड्रेस घेण्यास पसंती देत आहेत. साड्यांमध्ये विशाल, लक्ष्मीपती, विपूल अशा विविध नामवंत कंपनीच्या विविध प्रकारच्या साड्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. महिला वर्ग चोखंदळपणे रंग, त्यावरील डिझाईन, काठ, कापडाचा पोत, टिकली वर्क, जरदोशीवर्क केलेल्या आणि प्लेन अशा साड्या निवडताना आढळत आहेत. एकूणच सर्वच खरेदींवर ऑनलाइनचे आक्रमण झाले असलेतरी कापड बाजारपेठेत ग्राहकांची संख्या वाढलेलीच आहे. 

दिवाळी धमाक्यातच! साताऱ्यात आजपासून उडणार फटाका विक्रीचा बार

धाक : कोरोना अन्‌ कायद्याचा 

दिवाळीच्या खरेदीला गर्दी वाढणार हे गृहीत धरून सर्वच दुकानदारांनी दुकानात प्रवेश करतानाच कोरोना आणि कायदा यांच्या धाकाने सॅनिटायझरचा वापर अनिवार्य केला आहे. मास्क लावण्याचे प्रत्येकाला बंधनकारक केले आहे. 

युवावर्ग काहीसा ऑनलाइनकडे वळलेला असला, तरी चोखंदळ ग्राहक कपड्याचा दर्जा, पोत, रंग याबाबत अतिशय जागरूक असतात. त्यामुळे साड्या असुद्या नाहीतर तयार ड्रेस ते प्रत्यक्ष कपडा पाहिल्या शिवाय खरेदी करत नाही. यामुळे ग्राहक आहेतच. 
-सुनील शहा, म्हसवडकर ड्रेसेस, सातारा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large Crowd At Shops In Satara For Diwali Shopping Satara News