esakal | Video पाहा : भारतमाता की जय, अमर रहे'च्या घोषणांनी ओझर्डे दुमदुमले
sakal

बोलून बातमी शोधा

Soldier Somnath Tangade

Video पाहा : भारतमाता की जय, अमर रहे'च्या घोषणांनी ओझर्डे दुमदुमले

sakal_logo
By
पुरुषोत्तम ढेरे

कवठे (जि. सातारा) : ओझर्डे (ता. वाई) येथील हुतात्मा जवान सोमनाथ अरविंद तांगडे यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते मोहन भोसले, अधिकारी आदींनी हुतात्मा तांगडे यांना श्रद्धांजली वाहिली.

तांगडे (वय 38) यांना सिक्किम येथील कॉलिंग पॉंगमध्ये कर्तव्य बजावताना झालेल्या अपघातात उपचार सुरू असताना वीरमरण आले होते. सिग्नल रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या मागे वीरमाता पुष्पा (वय 65), वीरपत्नी रेश्‍मा (वय 35), लहान मुली सिद्धी (वय 11), स्वरा (वय 9) व भाऊ जीवन, विवाहित बहीण शोभा असा परिवार आहे.

हेही वाचा: ओझर्डेच्या जवानाला सिक्किममध्ये वीरमरण; सातारा जिल्ह्यावर शोककळा

आपल्या लाडक्‍या सोमनाथला अखेरचे डोळे भरून पाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी व परिसरातील ग्रामस्थ पाणावलेल्या डोळ्यांनी रस्त्याकडे वाट पाहात होते. हुतात्मा तांगडे यांचे पार्थिव रात्री त्यांच्या गावी ओझर्डे येथे पोचले. सर्वप्रथम त्यांच्या पार्थिवाचे तांगडे कुटुंबीय, ग्रामस्थांनी अंतिम दर्शन घेतले. त्या वेळी कुटुंबीय व ग्रामस्थांनी केलेला आक्रोश रात्रीच्या काळोखात आसमंत भेदून गेला. पार्थिव शवपेटीत ठेवल्यानंतर जवानांनी शासकीय इतमामात सलामी दिली. कोरोना संसर्गजन्य प्रादुर्भाव रोखण्याकरिता सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करीत हुतात्मा तांगडे यांची गावातून व नंतर सोनेश्वर येथील कृष्णा नदीकाठापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली.

त्यांच्यावर समस्त गावकऱ्यांनी फुलांचा वर्षाव केला. त्या वेळी "अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे'च्या घोषणा देत यात्रा काढण्यात आली. आपल्या सुपुत्राला शेवटचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी यात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढली होती. ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे बोर्ड व कमानी उभारण्यात आल्या होत्या. यात्रा मार्गावर ग्रामपंचायतीने निर्जंतुकीकरण केले होते. प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील गावकऱ्यांना गर्दी न करता सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करावे, अशा सूचना ध्वनिक्षेपकावरून देण्यात येत होत्या.

अंतिम संस्कारासाठी सोनेश्वर येथे चौथारा सजविला होता. या ठिकाणी पार्थिव आणल्यानंतर शासकीय इतमामात सलामी देऊन मान्यवरांच्या उपस्थित हुतात्मा तांगडे यांना श्रद्धांजली वाहिली. सर्व धार्मिक सोपस्कार झाल्यानंतर रात्री उशिरा मुखाग्नी देण्यात आला. या वेळी सोशल डिस्टन्सचे पालन करीत त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सैन्य दलातील जवान, पोलिस, तसेच शासकीय अधिकारी आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.

अभिमानास्पद! शिवरायांच्या भुमीतील 'प्रियांका'ची दमदार कामगिरी