ऊसतोड कामगारांच्या न्यायासाठी लक्ष्मण माने मैदानात

सिद्धार्थ लाटकर
Friday, 9 October 2020

अगोदर मजुरांना कारखान्यावर जाऊ द्या, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न महिना पंधरा दिवसांचा सोडवून होऊ द्या, त्यानंतर संप करा असे आवाहन लक्ष्मण माने यांनी केले आहे. 

सातारा : काही संघटनांनी कारखाने सुरू होण्याच्या अगोदरच संप पुकारल्याने ऊसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अगोदर ऊसतोड कामगारांच्या पोटाचा प्रश्न मिटवा आणि नंतरच संपाची मशाल पेटवा, असे आवाहन करत ऊसतोड कामगारांना कामगार म्हणून शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी ऊसतोड कामगार व मुकादम संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याचे माजी आमदार तथा भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले आहे.

माने म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे ऊस तोड कामगार आपल्या गावी घरी बसले असल्याने त्यांच्या हाताला कसलेही काम नाही. हातावरचे पोट असलेल्या ऊसतोड कामगारांना आपल्या कुटुंबाची खळगी भरण्यासाठी कारखान्यावर जाणे नितांत आवश्यक आहे. मात्र काही संघटनांनी कारखान्यावर जाण्या अगोदरच संप पुकारल्याने
ऊसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अगोदर मजुरांना कारखान्यावर जाऊ द्या, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न महिना पंधरा दिवसांचा सोडवून होऊ द्या, त्यानंतर संप करा असे आवाहनही माने यांनी केले आहे.

मराठा समाजाची परीक्षा पाहू नका; उदयनराजेंचा इशारा  

माने म्हणाले, आम्ही देखील त्या संपामध्ये सहभागी होऊ. ऊसतोड कामगारांची आजपर्यंत कोणत्याही प्रकारची नोंदणी झालेली नाही. ती नोंदणी राष्ट्रवादी ऊसतोड कामगार व मुकादम संघटनेच्यावतीने आम्ही करणार असून त्यांना न्याय देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करणार आहाेत. यावेळी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष गंगाधरराव पुरी, मराठवाडा संपर्क प्रमुख शंकर जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laxman Mane Founded Nationalist Sugarcane Worker Association Satara News