साहेब, माझा कुणावरच भरवसा न्हाय.. आता मी काय करू;  हताश माउलीची दरेकरांना साद

साहेब, माझा कुणावरच भरवसा न्हाय.. आता मी काय करू;  हताश माउलीची दरेकरांना साद

भिलार (जि. सातारा) : नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासमोर राजपुरी आंब्रळ व पांचगणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी गाऱ्हाण्यांचा पाढाच वाचला. सत्ताधाऱ्यांच्या करामतीची कोंडी फोडण्याचा प्रयत्न दरेकर यांनी केल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून ते अक्षरशः गहिवरले.

परतीच्या पावसाने झोडपलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ, राजपुरी या भागातील नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी करण्याकरिता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पाचगणी परिसरात आले होते. यावेळी त्यांनी आंबरळ, राजपुरी या गावातील नाचणी, हायब्रीड, वाटाणा, बटाटा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी युवानेते गजानन भोसले, यशराज भोसले, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, तहसीलदार सुषमा पाटील, कृषी अधिकारी श्री. जगताप, संतोष कवी, शेखर भिलारे, सचिन घाटगे, महाबळेश्वर तालुका प्रमुख मधुकर बिरामने, मंगेश उपाध्याय, महिला तालुका अध्यक्ष उषाताई ओंबळे, संतोष धनावडे, बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर बिरामने, जगन्नाथ भिलारे, नामदेव भिलारे, मोहन भोसले, अजित सपकाळ, किरण पुरोहित, नाना अंब्राळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

दहा वर्षे झाली पैसे भरतेय.. एकदाबी कर्जमाफी झाली न्हाय.. नुकसानभरपाई पण मिळाली न्हाय.. यावर्षी तर वाटाणा, नाचणी, बटाटा, हायब्रीड सगळंच पावसाने उद्ध्वस्त झालंय.. काल पंचनामा केलाय, पण माझा कुणावरच भरवसा न्हाई...आता मी काय करू.. अशी हताश अन् केविलवाणी भावना राजपुरी (ता. मश्वर) येथील आपत्तीग्रस्त शेतकरी कुसुम भिकू राजपुरे यांनी व्यक्त केली. यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता मी आलोय, तुम्हाला मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे सांगून त्यांनी तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व या महिलेला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, असे सांगितले. 

दरेकर यांनी लगेच आपल्या स्विय सहाय्यक यांना सांगून कुसुम राजपुरे यांना शेतातच 10000 रुपयांची आर्थिक मदत दिल्याने सर्वजण अवाक् झाले. आंब्रळ येथील शंकर अंब्राळे यांनी आपणाला गेली 10 ते 12 वर्षांपासून गाव टग्यामुळे काढलेल्या विहिरीला वीज कनेक्शन मिळत नसल्याची कैफियत मांडली. यावेळी शंकर अंब्राळे भावना विश झाले. त्यांना रडू कोसळले. यावर ना दरेकर यांनी तहसीलदार सुषमा पाटील यांना या प्रकरणाबाबत माहिती घेवून त्यांना वीज देण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले व काम झाल्यावर मला लगेच फोन करा, असेही तहसीलदार यांना सांगितले. ग्रामस्थ खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला अटकाव करीत असल्याचेही आंब्राले यांनी सांगितले.

त्याचबरोबर आंब्रळ येथीलच बाळासाहेब अंब्राळे यांनी आम्हाला विनाकारण गावाने वाळीत टाकले असून एकमेकांशी सबंध ठेवू नये, असे सांगितले. आमच्या शेतात दुसऱ्याचे औत आणले तर त्यालाही वाळीत टाकत आहेत. माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार आमच्याशी केले जात असल्याचे सांगितल्यावर ना दरेकर यांनी तातडीने पांचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना बोलावून वाळीत टाकने हा गुन्हा असून चौकशी करा व संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे त्यांनी सांगितले. ऐकूनच नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करण्यासाठी आलेल्या दरेकर यांनी सत्ताधारी गटातील लोकांच्या मनमानी कारभाराला आता जनता कंटाळली आहे. त्यामुळे त्यांच्या या सर्व प्रकरणांची चौकशी करून जनतेला न्याय देण्यासाठीच मी आता आलोय. यावेळी मधुकर बिरामने यांनी स्वागत केले, तर तानाजी भिलारे यांनी आभार मानले. 

माउलीकडून उन्हातान्हात राबून शेतीची मशागत

महिलेची व्यथा ऐकून दरेकर यांनी अत्यंत आवेशपूर्ण शब्दांत एकूण यंत्रणेचा समाचार घेतला. हे सगळं ऐकून मन हेलावत असल्याचे सांगून ना. दरेकर म्हणाले, या माउलीने अंगमेहनत करून, शेतात उन्हातान्हात राबून शेतीची मशागत केली आहे. परतीच्या पावसाने त्यांच्या पूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे, पण त्यांना वाटतच नाही की त्यांना नुकसान भरपाई मिळेल म्हणून. त्यांचा या यंत्रणेवरील भरवसा उडालाय. त्यांना आजवर कसलीही मदत मिळाली नाही, त्या खोटं बोलतील का? आपण सोसायट्या व नुकसान भरपाईची चौकशी करणार असल्याचेही सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com