शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; सरकारविरोधात दरेकर, शिवेंद्रसिंहराजे आक्रमक

विजय सपकाळ
Thursday, 22 October 2020

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार निश्चित परभणीत दिलेला शब्द पाळतील. नुकसानग्रस्त कोरडवाहू शेतीसाठी २५ हजार, बागायतसाठी ५० हजार व  फळबाग लागवडीसाठी १ लाख रूपये द्यावे. त्यांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा राज्यभर भारतीय जनता पार्टी जनआंदोलन उभारेल, मग ते मदत मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिला.

मेढा (जि. सातारा) : अतिवृष्टीत जावळी तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील रिटकवली व बिभवी गावांमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकात जावून पाहणी केली. स्वतः भुईमागाचा डाहाळा उपटून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांची गाऱ्हांनी ऐकून शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जास्तीत-जास्त भरपाईचा भरीव निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन दिले. ठाकरे सरकारने सरसकट प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना दहा ते १५ हजार रूपये तातडीची मदत द्यावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल, या होणाऱ्या परिणामाला सरकारच जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला. 

यावेळी त्यांच्या सोबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रांताधिकारी मीनाज मुल्ला, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंदकांत गोरड, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, रिटकवलीचे सरपंच सचिन दळवी, बिभवीच्या सरपंच जयश्री जाधव, सहायक पोलिस निरीक्षक निलकंठ, कृषीचे तंत्र आर. आर. देशपांडे राठोड, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, प्रकाश सुतार, तालुका सचिव बजरंग चौधरी, ग्रामसेवक संजय जुनघरे, राजेंद्र जाधव, राजू खुडे, सोनिया धनावडे आदी उपस्थित होते. प्रारंभी रिटकवली येथील बाधित शेतकरी महेश मर्ढकर यांच्या भुईमूग पिकाची पाहणी केली. त्यानंतर तालुक्याचे प्रमुख पीक असलेले भात या नुकसानग्रस्त भातशेतीची बिभवी व रिटकवली येथे पाहणी केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकांची माहिती दिली. या बाधित सर्वच शेतक्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याची मागणी केली. 

वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी सरकारवर दबाव आणू; दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

प्रवीण दरेकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार निश्चित परभणीत दिलेला शब्द पाळतील. नुकसानग्रस्त  कोरडवाहू शेतीसाठी २५ हजार, बागायतसाठी ५० हजार व  फळबाग लागवडीसाठी १ लाख रूपये द्यावे. त्यांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा राज्यभर भारतीय जनता पार्टी जनआंदोलन उभारेल, मग ते मदत मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, नुकसानीने अधिक चिंताग्रस्त, निराश होवू नका, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठीच आलोय. या वेळेस शेतकऱ्यांना न्याय मिळणारच, असे शेतक-यांना आश्वासन देत धीर दिला.

उदयनराजेंचे सूचक विधान लवकरच चांगले घडेल, फडणवीस आणि दरेकर राज्य ताब्यात घेतील

गेल्या घरी सुखी रहा​!

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेले तरी याचा पक्षावर काहीही परिणाम होणार नाही. त्यांना शुभेच्छा! पक्षासाठी त्यांचे योगदान मोठे असले तरी पक्षानेही त्यांना सर्वकाही दिले. व्यक्तिदोष हे निमित्त मात्र, त्यांना जायचे होते ते गेले. गेल्या घरी सुखी रहा, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader Of Opposition Praveen Darekar Inspected The Crop Damage In Jawali Taluka Satara News