महाबळेश्वरातील शेतकऱ्यांना वेगळ्या निकषाची गरज नाही : दरेकर

अभिजीत खुरासणे
Friday, 23 October 2020

गेली तीन दिवस भाजपाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नुकतीच त्यांनी महाबळेश्वर येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी येथील हिरडा विश्रामगृहावर तालुक्यातील अधिकारी यांची बैठक घेवून तालुक्याचा आढावा घेतला.

महाबळेश्वर (जि. सातारा) : महसूल विभागाने केलेले पंचनामे पीक विमा कंपनीने ग्राह्य धरून शेतक-यांना तत्काळ विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी महाबळेश्वर येथील आढावा बैठकीत केली. 

गेली तीन दिवस भाजपाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी त्यांनी महाबळेश्वर येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी येथील हिरडा विश्रामगृहावर तालुक्यातील अधिकारी यांची बैठक घेवून तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नारायण घोलप, मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

झोपलेल्या सरकारला जाब विचारणार; आठवलेंचा ठाकरे सरकारवर घणाघात 

महाबळेश्वर तालुक्यात 600 हेक्टर भात शेती होते. या पैकी 510 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी युध्दपातळीवर पंचनाम्याचे काम करावे, शेतक-यांना विमा कंपनीचे ऑफलाइन, ऑनलाइन अर्ज व माहिती भरण्याचे जमेल असे नाही, अशा वेळी महसूल विभागाच्या अधिका-यांनी शेतक-यांना मदत केली पाहिजे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 137 रस्त्यांचे नुकसान झाल्याची माहिती गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी या बैठकीत दिली तर, अतिवृष्टीमुळे चतुरबेट येथील पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पुलाचे काम नाबार्डमधून करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता गोंजारी यांनी दिली. 

उदयनराजेंचे सूचक विधान लवकरच चांगले घडेल, फडणवीस आणि दरेकर राज्य ताब्यात घेतील

अतिवृष्टीच्या काळात तालुक्यातील पाच म्हशी वाहुन गेल्याची माहीत डॉ. पूनम भोसले यांनी दिली. शेतीच्या नुकसानीसाठी सलग पाच दिवस 25 मिली मीटर पाऊस पडणे आवश्यक आहे, परंतु महाबळेश्वर हे असे ठिकाण आहे येथे सतत रोज या पेक्षा कितीतरी अधिक पाऊस पडत असतो, त्यामुळे येथील शेतकरी यांना वेगळे निकष लावण्याची आवश्यकता नाही, असेही दरेकर म्हणाले. येथील विकास सोसायटयांबाबत शेतक-यांनी खूप तक्रारी केल्या आहेत. शेतकरी यांच्याबाबत भेदभाव व पक्षपात करतात अशा सोसायट्यांची चौकशी करण्याचे आदेशच दरेकर यांनी दिले. या बाबत आपण सातारा जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बोलणार असल्याचेही त्यांनी बैठकीत बोलताना सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader of Opposition Praveen Darekar Inspected The Damage To Agriculture In Mahabaleshwar Satara News