esakal | जगणं मुश्किल! निम्मे लक्ष मोबाईलवर, निम्मे बिबट्यावर; विद्यार्थ्यांसह नोकरदार अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलाच्या कुशीत ढेबेवाडी खोऱ्यातील निवी, कसणी, घोटील, निगडे यासह अनेक गावे वसलेली आहेत.

जगणं मुश्किल! निम्मे लक्ष मोबाईलवर, निम्मे बिबट्यावर

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : गावाबाहेर विशिष्ट ठिकाणीच मोबाईलला रेंज (Mobile Range) व नेट मिळत असल्याने ढेबेवाडी विभागातील जंगलालगतच्या दुर्गम (Dhebewadi Forest) गावातील विद्यार्थी (Online Education), नागरिक आणि वर्क फ्रॉम होम (Work from home) करणारे नोकरदार अडचणीत सापडले आहेत. पायपीटीची नव्हे तर बिबट्याच्या (Leopard) संचाराची चिंता त्यांना भेडसावत आहे. धनावडेवाडी (निगडे, ता. पाटण) येथील पाणवठ्याजवळ मोबाईल व लॅपटॉपवर कामकाज करत बसलेल्या काहीजणांसमोर साक्षात बिबट्या उभा राहिल्याची घटना नुकतीच घडल्याने नागरिकांच्या काळजीत भर पडली आहे. (Leopard Roaming In Dhebewadi Forest Area Satara Marathi News)

सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलाच्या कुशीत ढेबेवाडी खोऱ्यातील निवी, कसणी, घोटील, निगडे यासह अनेक गावे वसलेली असून, वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाबरोबरच इतरही अनेक समस्यांमुळे तेथील नागरिकांना पावलापावलावर अडचणींशी सामना करावा लागत आहे. त्यामध्ये मोबाईल रेंजच्या समस्येचाही समावेश आहे. अपवाद वगळता घरोघरी मोबाईल असले तरी रेंज व नेट मिळत नसल्याने कधी गावाबाहेर विशिष्ट ठिकाणी, झाडावर किंवा घराच्या छप्परावर जाऊन मोबाईलवरून संपर्क साधण्याशिवाय पर्याय उरत नाही. पोटापाण्यासाठी पुण्या- मुंबईत वास्तव्यास असलेली तेथील अनेक कुटुंबे गेल्या वर्षभरापासून लॉकडाउनमुळे (Coronavirus lockdown) गावाकडेच आहेत. विद्यार्थी, नोकरदार यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे.

हेही वाचा: चुकीच्या नेतृत्वाची किंमत देश मोजतोय

नेटवर्क नसल्याने मोबाईल, लॅपटॉप घेऊन दिवस हे लोक रेंज मिळणाऱ्या विशिष्ट ठिकाणी बसलेले दिसतात. अलीकडे धनावडेवाडी (निगडे, ता. पाटण) येथील पाणवठ्याजवळ मोबाईल व लॅपटॉपवर कामकाज करत बसलेल्या काही जणांसमोर साक्षात बिबट्या उभा राहिल्याची घटना घडली. बिबट्याला बघून तेथे उपस्थितांची भीतीने गाळण उडाली. बिबट्या तेथून निघून जाताच त्या सर्वांनी घराकडे धूम ठोकली. या प्रकारानंतर आता तेथे ग्रामस्थ एकटे- दुकटे जाण्यास घाबरत आहेत. जिथे मोबाईलला नेटवर्क आहे; परंतु बिबट्यासह वन्यश्वापदांचा वावरही आहे, अशी अनेक निर्जन ठिकाणे डोंगर परिसरात आहेत. त्यामुळे निम्मे लक्ष मोबाईलवर आणि निम्मे बिबट्याकडे अशीच काहीशी स्थिती तेथून ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांची झालेली आहे.

हेही वाचा: सारथी संस्थेकडे निधी वळवून मागासवर्गीयांवर अन्याय

डोंगर भागात मोबाईल नेटवर्कची समस्या पूर्वीपासूनच कायम असल्याने रेंज येणारी आडवळणीची ठिकाणे गाठण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. संबंधित यंत्रणांनी यामध्ये लक्ष घालून जनतेला दिलासा द्यायला पाहिजे.

-शंकरराव पवार, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, निगडे.

Leopard Roaming In Dhebewadi Forest Area Satara Marathi News

loading image