महाबळेश्वरातील पथारी व्यावसायिक होऊ लागलेत 'आत्मनिर्भर'; कसे ते वाचा

अभिजीत खूरासणे
Thursday, 10 September 2020

कर्जाची नियमित परतफेड केल्यास सात टक्के व्याजात सूट आणि पुढे मोठे भांडवली कर्ज देण्यात येईल, तसेच लाभार्थीने डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅकदेखील दिले जाणार आहे.
 

महाबळेश्वर : कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र पसरल्यामुळे आणि टाळेबंदीत पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर झालेल्या विपरीत परिणामाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व फेरीवाला /फळविक्रेत्यांना आपले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेंतर्गत दहा हजार रुपये खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, येथील पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे.
 
भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, भजी- वडापाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, पुस्तके, स्टेशनरी इत्यादी विक्रेत्यांचा या योजनेत समावेश आहे, तसेच केशकर्तनालय, चर्मकार, पानदुकान, कपडे धुण्याची दुकान यांचाही समावेश असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. त्याद्वारे पथविक्रेत्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. ही योजना 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वी पथविक्री करत असलेल्या सर्व पथविक्रेत्यांना लागू आहे.

..तसे न झाल्यास तमाशा फडमालक आक्रमक भूमिका घेतील! 
 
दरम्यान, महाबळेश्‍वरात या योजनेमध्ये आजपर्यंत 153 शहरी फेरीवाल्यांनी अर्ज केलेले होते. त्यापैकी 70 पात्र लाभार्थींचे कर्जाचे प्रस्ताव बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या महाबळेश्वर शाखेने मंजूर करून त्यांच्या बॅंक खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये वर्ग केलेले आहेत. कर्जाची नियमित परतफेड केल्यास सात टक्के व्याजात सूट आणि पुढे मोठे भांडवली कर्ज देण्यात येईल, तसेच लाभार्थीने डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅकदेखील दिले जाणार आहे.

सभापतींनी जपलं सामाजिक भान, दवाखान्यासाठी दिली 15 गुंठे जागा दान!

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loan Facility Benefical To Mahableshwar Hawkers Satara News