
सातारा : कर्जमाफी होण्याच्या आशेवर असलेल्या अनेक शेतकऱ्यांसह शेती प्रक्रिया उद्योग करणाऱ्यांनीही कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. पीक कर्ज घेणाऱ्या एक लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे मार्चअखेरकडे वाटचाल करताना कर्ज वसुलीची चिंता सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंकांपुढे निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका जिल्हा बॅंकेच्या मध्यम व दीर्घ मुदत कर्ज वसुलीला बसला आहे, तर मार्च जवळ आल्याने बहुतांशी बॅंकांनी आता थकबाकीदारांना नोटिसा पाठवून कर्ज भरण्यासाठी तगादा सुरू केला आहे.