मलकापुरात दोन टप्प्यात लॉकडाउन; उद्यापासून अंमलबजावणी

राजेंद्र ननावरे
Thursday, 10 September 2020

शहरातील कोरोना साखळी खंडित करणे गरजेचे आहे. त्यासाठी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात तीन हजार रॅपिड टेस्ट करण्याची तरतूद व दोन ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करण्याची तयारी पालिकेने केली असल्याचे उपाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.

मलकापूर (जि. सातारा) : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मलकापूरला दोन टप्प्यात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्यात शनिवार (ता. 12) ते मंगळवार (ता. 15) या पहिल्या चार दिवसांत अत्यावश्‍यक सेवा वगळून कडकडीत लॉकडाउन, तर त्यानंतरच्या चार दिवसांत सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या लॉकडाउनच्या हाकेला सर्वपक्षीय बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 
या वेळी नगराध्यक्ष नीलम येडगे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, विरोधी पक्ष नेते अजित थोरात, महिला व बालकल्याण सभापती आनंदी शिंदे, नगरसेविका नंदा भोसले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन काशीद, भाजप शहराध्यक्ष सूरज शेवाळे, युवा मोर्चाचे तानाजी देशमुख, पोलिस पाटील प्रशांत गावडे, नगरसेवक सागर जाधव, राजू मुल्ला, जयंत कुराडे, आनंदराव सुतार, गणेश चव्हाण, हणमंत शिंगण, आण्णासो काशीद यांच्यासह आजी माजी नगरसेवक व व्यावसायिक उपस्थित होते. 

कोरेगावात स्वयंस्फूर्त बंदला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद 

उपाध्यक्ष शिंदे म्हणाले, चार महिन्यांचा विचार करता सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत शहरात 175 कोरोना रुग्ण आढळून आले. शहरातील कोरोना साखळी खंडित करणे गरजेचे आहे. त्यासाठी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात तीन हजार रॅपिड टेस्ट करण्याची तरतूद व दोन ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करण्याची तयारी पालिकेने केली आहे. नितीन काशीद म्हणाले, अनेक बंधने असूनही काही नागरिक कोरोनाचे गांभीर्याने नाही. होम क्वारंटाइन केलेले लोक फिरत आहेत. प्रशासनाने तपासणी वाढवल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. या वेळी श्री. यादव श्री. गावडे सौ. येडगे, तानाजी देशमुख, गुणवंत भोसले, अविनाश फुके, मुकुंद माने, निरंजन जगताप यांची भाषणे झाली. अजित थोरात यांनी आभार मानले.

पाटणच्या डॉक्‍टरांना 1200 पीपीई किटचं संरक्षण कवच

संशयितांच्या ऍण्टीजेन टेस्ट होणार 
कोरोनाची तपासणी करण्यासाठी नगरपालिकेने तीन हजार किट आणण्याचा निर्णय घेतला आहे. ते किट आल्यानंतर चाचणी सुरू होणार आहे. प्रभागनिहाय दोन पोर्टेबल ऑक्‍सिजन किट पालिकेने आणले आहे. पाचवडेश्वरात स्वतंत्र कोविड स्मशानभूमी होत आहे. कोविड बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कऱ्हाड पालिकेवरील अंत्यविधीचा वाढता ताण विचारात घेता पालिकेने हे नियोजन केले आहे. त्यासाठी दहा कर्मचाऱ्यांची स्वयंसेवकासह नेमणूक केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown From Tomorrow At Malkapur Satara News