लोणंद : वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lonand

Lonand : वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग सज्ज

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार व खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ती जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे यांनी दिली.

श्री. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे ता. २८ रोजी लोणंदला अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी आगमन होत आहे. या काळात सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. वारकरी व भाविकांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी पालखी मार्गावरील एक सार्वजनिक विहीर, १८ खासगी विहिरी, आठ हातपंप, एक जॅकवेल, सहा बोअर विद्युतपंप, १२ टँकर फिलिंग पॉइंट येथे ५९ कर्मचारी व अधिकाऱ्यांची १८ पथके नेमण्यात आली आहेत. पाण्याचे, तसेच टीसीएलचे नमुने सातारा येथील प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी कर्मचाऱ्यांची पाच पथकांची नियुक्ती केली आहे.

जलशुद्धीकरणासाठी टीसीएल व मेडिक्लोअरचा पुरेशा प्रमाणात साठाही उपलब्ध करण्यात आला आहे. भाविकांना २४ तास आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सात स्थिर वैद्यकीय पथकांमध्ये १०५ वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविका यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र, पालखी तळ, सईबाई हाउसिंग सोसायटी, बाळासाहेबनगर येथे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करण्यात आला आहे. यासाठी चार स्थिर आरोग्य पथके व १०२ क्रमांकाच्या तीन रुग्णवाहिका ही तैनात ठेवल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारच्या औषधांची मागणी करून औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवला आहे.

लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील तपासणी प्रयोगशाळा २४ तास कार्यान्वित ठेवण्याची व्यवस्था केली आहे. जिल्हा परिषदेकडून अत्यावश्यक व किरकोळ आजारावरील उपचारासाठी एक समुदाय अधिकारी व एक आरोग्य कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहनावरील १७ आरोग्य दूत यांची औषधांसह नेमणूक केली आहे. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र व पालखी तळावरील आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमले आहेत. डासांपासून चिकनगुन्या, डेंगी आदी आजारांचा फैलाव होऊ नये, म्हणून ९० कर्मचाऱ्यांच्या ४५ पथकांद्वारे संपूर्ण लोणंद शहरात सर्वेक्षण करून दूषित पाणी व भांडी रिकामी करून तपासणी करण्यात आली आहे. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे २४ तास कर्मचारी नेमून कंट्रोल रूमची व्यवस्था केली आहे.

बोगस डॉक्टरांवर नजर

पालखी सोहळ्यात बोगस डॉक्टरांवर नजर ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दोन पथके नेमली आहेत. आपत्कालीन व्यवस्थेसाठी शहरातील खासगी रुग्णालयातील दहा टक्के कॉटस आरक्षित करण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावरील व लोणंद शहरातील सर्व हॉटेल्स, फळविक्रेते, चहा टपरीधारक यांच्या पाणी व अन्न तपासणीसाठी स्वतंत्र आरोग्य पथक नेमून तपासणी करण्यात येत आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांना व भाविकांना आरोग्य सेवा चांगल्याप्रकारे पुरवून वारकऱ्यांच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे, अशी माहितीही डॉ. पाटील व डॉ. बागडे यांनी दिली.