तुम्हाला भाजप चालतो, तर आम्हालाही चालतो; काँग्रेसचा NCP आमदाराला थेट विरोध I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress vs NCP

‘होमपिच’वरच पराभव पत्करावा लागल्याने भाजपचे ज्‍ये‍ष्ठ नेते शेळके-पाटील यांना मोठा धक्का बसला होता.

तुम्हाला भाजप चालतो, तर आम्हालाही चालतो; काँग्रेसचा NCP आमदाराला विरोध

लोणंद (सातारा) : नगरपंचायतीच्या (Lonand Nagar Panchayat) स्वीकृत नगरसेवक निवडीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress Party) आपले वर्चस्व सिध्द करत लोणंद शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सागर शेळके-पाटील यांना, तर काँग्रेस (Congress), भारतीय जनता पक्ष (BJP) व अपक्ष आदी सात नगरसेवकांनी एकत्र येऊन भाजपचे ज्‍येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती आनंदराव शेळके-पाटील यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात पाठवले आहे. आनंदरावांना पाठिंबा देताना काँग्रेसने या निमित्ताने तुम्हाला भाजप चालतो? तर आम्हालाही चलतो, हे दाखवून देताना केवळ आणि केवळ आमदार मकरंद पाटील यांना स्पष्टपणाने विरोध दर्शवण्याचा प्रयत्न या निवडीच्या निमित्ताने झाल्याचे दिसत आहे.

काँग्रेसचे ज्‍येष्ठ नेते अॅड. बाळासाहेब बागवान यांच्या निधनानंतर प्रथमच निवडणुकीला सामोरे गेलेल्या काँग्रेसला फारसे यश मिळवता आले नाही. केवळ तीन जागा मिळाल्या. पक्षाचे नेतृत्व करणारे खंडाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष व (कै.) अॅड. बागवान यांचे चिरंजीव सर्फराज बागवान यांनाच दस्तुरखुद्द पराभव पत्करावा लागला. केवळ त्यांच्या सुनेने प्रभाग दोनमधून निवडून येत (कै.) अॅड. बागवान यांचा आब राखला. दरम्यान, स्वीकृत नगरसेवक निवडीच्या निमित्ताने काँग्रेसने अत्यंत सावध पवित्रा घेत फायद्या-तोट्याचा विचार न करता पक्ष व गटाच्या अस्‍तित्वासाठी (कै.) अॅड. बागवान यांचे लोणंदच्या राजकारणातील गेली ३५ वर्षे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे ज्‍येष्ठ नेते आनंदराव शेळके-पाटील यांना साथ देताना, ज्‍येष्ठ नेते म्हणून त्यांचा मान राखला. स्थानिक नेतृत्वाला साथ दिल्याची भावना दर्शवली आणि सभागृहात राष्ट्रवादीच्या दहा नगरसेवकांना जशास तसे उत्तर देण्याची क्षमता वाढवली.

हेही वाचा: 'राजकारणात हार-जीत होत असते, आता जावळीत अधिक लक्ष घालणार'

तर दुसरीकडे गेल्या वेळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडे सहा व राष्ट्रवादीकडे आठ नगरसेवक असतानाही आमदार मकरंद पाटील यांनी आघाडीचा धर्म न पाळता भाजपच्या दोन नगरसेवकांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले होते. यावेळी काँग्रेसने भाजपला साथ देत तीच पुनरावृत्ती करत तुम्हाला भाजप चालतो? आम्हालासुध्दा चालतो, हे दाखवून देताना आमदार मकरंद पाटील यांच्या गतवेळच्या कृतीला प्रत्‍युत्तर देत त्यांना स्पष्टपणाने विरोध दर्शवण्याचाच प्रयत्न या निमित्ताने काँग्रेसकडून झाला आहे. राष्ट्रवादीकडून अपेक्षेप्रमाणे सागर शेळके-पाटील यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देत निष्ठावंत व तडफेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका घेतली जाते, हेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी सिद्ध केले आहे.

हेही वाचा: Odisha Panchayat Election : ओडिशात BJD पडलं भाजपवर भारी

काहीही घडो मी असणारच!

निवडणुकीत सून व खुद्द स्वतः ४० वर्षांच्या खंडानंतर तेही ‘होमपिच’वरच पराभव पत्करावा लागल्याने भाजपचे ज्‍ये‍ष्ठ नेते आनंदराव शेळके -पाटील यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, काहीही घडो मी असणारच, हाच विश्वास व निर्धार सार्थ ठरवत काँग्रेस व अपक्षांच्या साथीने आनंदराव अखेर नगरपंचायतीच्या सभागृहात डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला.

Web Title: Lonand Nagar Panchayat Congress Supports Anandrao Shelke Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top