माणमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत जादा कोरोनाबाधित

फिरोज तांबोळी
Saturday, 5 December 2020

लोकसंख्येच्या तुलनेत मात्र, माण तालुक्‍यात जास्त कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सर्वांनीच वेळीच काळजी न घेतल्यास ही संख्या झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

गोंदवले ( सातारा) : अनलॉकनंतर कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या दोन अंकीवरून पुन्हा चार अंकी झाली आहे. गेल्या १० दिवसांतील सातारा तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक तर महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वांत कमी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मात्र, माण तालुक्‍यात जास्त कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सर्वांनीच वेळीच काळजी न घेतल्यास ही संख्या झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : साता-यात 179 नागरिकांना डिस्चार्ज ; 409 जणांचे नमुने तपासणीला
 
गेल्या आठ महिन्यानंतर कोरोना आवाक्‍यात आल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने सर्वत्र अनलॉक केले. अद्याप संपूर्ण अनलॉक करण्यात आले नसले तरी लोक मात्र, आता बिनघोरपणे फिरताना दिसत आहेत. शासनाने बंधने घालूनही विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सामाजिक अंतराच्या नियमांचेही तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य व पोलिस यंत्रणा कार्यरत असूनही सध्या बहुतांशी लोक निष्काळजीपणे वागत असल्याचे चित्र आहे. याशिवाय वातावरणात वारंवार होत असलेल्या बदलामुळे सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. परिणामी आता पुन्हा कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. 

हे ही वाचा : साता-यात 115 नागरिकांचे अहवाल पाॅझिटीव्ह ; 6 बाधितांचा मृत्यू

नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या १० दिवसांच्या आकडेवारीवरून जिल्ह्यात तब्बल 1768 कोरोनाबाधित नव्याने आढळून आले आहेत. यामध्ये सातारा तालुक्‍यात सर्वाधिक 358 तर त्यापाठोपाठ फलटण तालुक्‍यात 337 तर माणमध्ये 213 कोरोनाबाधित आढळले आहेत. सर्वांत कमी कोरोनाबाधित महाबळेश्वर तालुक्‍यात आहेत. जनगणना 2011 नुसार सातारा तालुक्‍याची लोकसंख्या पाच लाख 20 हजार 49 व फलटण तालुक्‍याची लोकसंख्या तीन लाख 42 हजार 667 आहे.

माणची लोकसंख्या दोन लाख 25 हजार 634 आहे. लोकसंख्येचा विचार करता माणमध्ये मात्र कोरोनाबधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्यातरी जिल्ह्यात माण तालुक्‍यात रुग्णवाढीचा वेग अधिक असल्याचे दिसत आहे. आगामी काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वांनीच नियमांचे काटेकोर पालन करून काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. 

अशी आहे स्थिती 
 
20 ते 30 नोव्हेंबर या काळात तालुकानिहाय आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या : 
सातारा-358, जावळी-62, कऱ्हाड- 139, माण-213, खटाव-171, कोरेगाव-151, फलटण-337, वाई-75, महाबळेश्वर-33, खंडाळा-142, पाटण-47, इतर-40. 

संशयित रुग्ण तपासणी वाढविण्यात आली असल्याने कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत आहेत. लोकांनी कोणताही आजार न लपविता तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करून सर्वांनी काळजी घ्यावी. 
-डॉ. लक्ष्मण कोडलकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, माण  

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maan taluka has been found to be more corona than the population