
पालिकेतील विविध विषय समित्यांच्या या निवडींकडे शहराचे लक्ष लावून होते.
महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या विविध विषय समितींच्या निवडीसाठी नगरसेवकांमधून एकही नामनिर्देशन पत्र आले नाही. त्यामुळे विशेष सभाच रद्द करण्यात आली आहे. सलग तिसऱ्यांदा ही निवड प्रक्रिया रद्द करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे.
पालिकेच्या गेली दोन वर्षे रखडलेल्या विविध विषय समितीच्या सभापती निवडीसाठी पालिकेने ऑनलाईन विशेष सभा साेमवारी आयोजित केली होती. या निवडीसाठी नगरसेवकांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. पालिकेतील सत्ताधारी आघाडीने या निवडींसाठी आपल्या सदस्यांना व्हीप बजावल्याने ही निवड चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त केला जात हाेता. परंतु प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. त्यामुळे निवडीसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष सभा रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
रानगव्यांचा कासला पुन्हा गव गवा
पालिकेत तीन आघाड्या असून यापैकी दोन आघाड्या सत्तेत आहेत. या तीनही आघाड्यांमधील काही सदस्यांनी आघाडीचा त्याग करून विरोधी आघाड्यांशी हातमिळवणी केल्याने पालिकेत मोठी राजकीय उलथापालथं झाली. त्यामुळे पालिकेतील विविध विषय समित्यांच्या या निवडींकडे शहराचे लक्ष लावून होते. प्रत्यक्ष सभेकडे पालिकेतील विद्यमान सदस्यांनी पाठ फिरवल्याने विविध विषय समितीच्या जागा रिक्तच राहिल्या.
पालिकेतील विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर येथे भेट देऊन पालिकेतील सदस्यांसोबत चर्चा करून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी व शिवसेना सदस्यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी भाजप सदस्यांमध्ये देखील या निवडणुकीमध्ये रस नसल्याचे दिसून आल्याने त्यांनीही सभेकडे पाठ फिरवली अशी चर्चा हाेती.
पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात युवती ठार; मुंढेत शाेककळा
Edited By : Siddharth Latkar