पत्नीशी भांडून आलेल्या पुण्यातील युवकाचा महाबळेश्वरच्या द-या खाे-यात शाेध सुरु

अभिजीत खूरासणे
Wednesday, 20 January 2021

रोमित याचे मित्र व मावसभाऊ, मेहुणे महाबळेश्वरला आले. त्यांनी रोमितची गाडी उघडली. त्यामध्ये तुटलेला मोबाईल आढळून आला. गाडीत इतर काही साहित्य नव्हते.

महाबळेश्वर : पुण्यात पत्नीशी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून घराबाहेर पडलेल्या रोमित गजानन पाटील (वय ३२, रा. रावेत, ता. हवेली, जि. पुणे) या युवकाची कार महाबळेश्वरपासून (Mahableshwar) चार किलोमीटर अंतरावर बेवारस स्थितीत आढळून आली. संबंधित युवकाचा अंबेनळी घाटातील जंगलात महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान व पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

याबाबत माहिती अशी की, फुलगाव (ता. हवेली) येथील एका कंपनीमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर असलेल्या रोमित पाटील याचे शनिवारी (दि. १६) किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणातून रोमित कार घेऊन सायंकाळी पाच वाजता बाहेर पडला. दोन दिवसांनंतरही तो परत न आल्याने त्याच्या पत्नीने देहूरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. देहूरोड पोलिसांनी रोमितची छायाचित्रे जवळपासच्या पोलिस ठाण्यांना पाठवून शोध सुरू केला; मात्र तपास लागला नाही.

पिलीव घाटात सातारा-पंढरपूर बसवर दगडफेक; दरोड्याच्या अफवेने सातारा-सोलापूर पोलिसांची पळापळ

दरम्यान, मंगळवारी सकाळी महाबळेश्वर पोलिसांना महाबळेश्वरपासून चार किलोमीटर अंतरावर अंबेनळी घाटात दोन दिवसांपासून एक कार बेवारस स्थितीत उभी असल्याची माहिती मिळाली. महाबळेश्वर पोलिसांनी वाहनाच्या क्रमांकावरून शोध घेतला असता हे वाहन रावेत येथील रोमित गजानन पाटील हे चालवीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. रोमित हे रावेत येथून बेपत्ता असल्याचेही पोलिसांना माहिती मिळाली. बेवारस कारबाबत महाबळेश्वर पोलिसांनी पाटील यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. ज्या भागात वाहन उभे आहे त्या परिसराचा शोध घेण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले.

गगन भरारी! जागतिक विक्रमासाठी साताऱ्यातील पाच बाल वैज्ञानिकांची निवड

महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सुनीलबाबा भाटिया ,नगरसेवक कुमार शिंदे ,अनिल केळगने ,अनिकेत वागदरे , अक्षय नाविलकर , जयवंत बिरामने , बापू शिंदे आदींनी दोन दिवस अंबेनळी घाटात संशयित ठिकाणी शोध सुरू केला. जवान घाटात सुमारे ३५० फूट दरीत उतरून शोध घेत होते; परंतु त्याचा कोठेही शोध लागला नाही. रोमित याचे मित्र व मावसभाऊ, मेहुणे महाबळेश्वरला आले. त्यांनी रोमितची गाडी उघडली. त्यामध्ये तुटलेला मोबाईल आढळून आला. गाडीत इतर काही साहित्य नव्हते. महाबळेश्वर पोलिसांनी रोमितने घाटात सोडलेली गाडी नातेवाइकांच्या ताब्यात दिली.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahableshwar Trekkers Searched Missing Pune Youth In Valley Satara Marathi News