सातारा: कोयना धरणासह जिल्ह्यातील विविध प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन धरणातून विसर्ग वाढविला जात आहे. त्यामुळे या वाढत्या विसर्गामुळे बाधित होणाऱ्या लोकांना आवश्यकता भासल्यास स्थलांतरित करण्यासाठी यंत्रणांनी तयारी ठेवावी. जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या धरण कार्यस्थळावर थांबावे. कोणत्याही स्थितीत लोकांची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे. कोणीही मुख्यालय सोडू नये, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.