लोककलावंत म्हणतात मानधन दिले, जगणे मुश्‍किल!

बाळकृष्ण मधाळे
Thursday, 6 August 2020

कोरोना विषाणू आणि टाळेबंदीमुळे लोककलांवंतांवर उपासमारीचे वेळ आली आहे. चार महिन्यांपासून उत्पन्न नाही आणि पुढे उत्पन्न कधी मिळणार याची खात्री नसल्याने लोककलाकरांच्या जगण्याचा प्रश्‍न बिकट बनला आहे. राज्य शासनाने काही अंशी दिलासा दिला असला, तरी आणखी निधी मिळण्याची अपेक्षा आहे असे शाहीर प्रकाश फरांदे यांनी नमूद केले.

सातारा :  सध्या आपला देशच नव्हे, तर संपूर्ण जग कोरोना या संसर्गजन्य आजाराने त्रस्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योग धंदे बंद आहेत. यात्रा-जत्रा, लग्न समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाल्याने त्यावर अवलंबून असणा-या सर्व कलाकारांचे जगणे मुश्‍किल बनले आहे. कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून सर्व कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान लोककलावंतांची होणारी उपासमार रोखण्यासाठी राज्य शासनाने नुकतेच 1276 रुपये मानधन जमा केले आहे. परंतु हे मानधन त्यांच्यासाठी तुटपुंजी ठरत आहे.

लोककलावंत हे गोंडस नाव आज ज्यांचे पोट भरण्यास पुरेसे नाही, त्यांच्याशी संवाद साधताना लोकांना स्वतःची प्रतिष्ठा महत्वाची वाटत आहे. दरम्यान, विविध स्वरुपाच्या कार्यक्रमातून आपली कला सादर करुन मिळणा-या मोबदल्यातून आपला संसार चालवणे शाहीर, लोककलाकार तसेच नाट्य, लोकनाट्य, पथनाट्य, सिनेकलावंत, तमाशा कलावंत, नृत्यकार, जादूगार, भारुड, वासुदेव, सोंगी भजन, धनगरी गजर, सुरते, सोंगाडे, वाघ्यामुरळी, गायक, गोंधळी, पोतराज, भजन, नंदीवाले, ढोलपथक, बहुरुपी कलाकार इत्यादी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या समूहास न्याय मिळावा त्यांच्या समस्या शासन सुटाव्यात यासाठी महाराष्ट्र भूषण शाहीर पुंडलिक फरांदे प्रतिष्ठानतर्फे सातत्याने आंदोलन वैगरे केले जाते.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाइन पद्धतीचा सातारा जिल्ह्यात प्रथमच प्रयाेग

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वृध्द साहित्यीक, शाहीर व लोककलाकरांचे मानधन रखडल्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा राहिला होता . शाहीर व लोककलाकरांच्या अडीअडचणीचा शोध बोध घेवून त्यांच्या व्यथा प्रतिष्ठानने शासन दरबारी नुकत्याच मांडल्या होत्या. यामध्ये वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करुन वयोवृध्द साहित्यीक, शाहीर व लोककलाकारांच्या थकीत मानधनाचा प्रश्‍न त्वरित मार्गी लावला. थकीत मानधनापैकी मार्च, एप्रिल महिन्याचे मानधन एकत्रितपणे 1276 रुपये इतके मानधन कलावंतांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहे. तसेच उर्वरित मानधन सुध्दा शक्‍य तितक्‍या लवकर मिळेल अशी माहिती शाहीर प्रकाश फरांदे यांनी दिली. 

आयएएस डॉ. अश्विनी वाकडेंच्या भावाला 'ती' गाेष्ट खटकली हाेती

सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा 

कोरोनामुळे सर्वांचीच हानी पहायला मिळत आहे. लोककलांवंतांवरही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. लोककलांवंतांवर होणारी उपासमारी रोखण्यासाठी सामाजिक संघटनांनी देखील पुढाकार घेणे आवश्‍यक आहे, अन्यथा आपली लोककला लोप होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

 

कोरोना विषाणू आणि टाळेबंदीमुळे लोककलांवंतांवर उपासमारीचे वेळ आली आहे. चार महिन्यांपासून उत्पन्न नाही आणि पुढे उत्पन्न कधी मिळणार याची खात्री नसल्याने लोककलाकरांच्या जगण्याचा प्रश्‍न बिकट बनला आहे. राज्य शासनाने काही अंशी दिलासा दिला असला, तरी आणखी निधी मिळण्याची अपेक्षा आहे. 

-शाहीर प्रकाश फरांदे 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Government Released Fund Of Folk Artists