यशवंतरावांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल; सहकारमंत्री बाळासाहेब पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशवंतरावांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल; सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

यशवंतरावांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल; सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

कऱ्हाड - जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्रासाठी असलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या विचारांवर राज्य शासनाचे काम सुरु आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 37 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कऱ्हाड (जि. सातारा) येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास सहकारमंत्री पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, नगरसेवक सौरभ पाटील, सह्याद्रि साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले.

त्यानंतर कॉंग्रेसच्यावतीने सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा, मलकापुरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कऱ्हाड शहराध्यक्ष नगरसेवक आप्पा माने, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, नगरसेवक इंद्रजीत गुजर, मलकापुरचे नगरसेवक राजेंद्र यादव आदींनी अभिवादन केले. दरम्यान जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, सभापती विजय वाटेगावकर यांच्यासह नगरसेवक, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरीकेंनी अभिवादन केले.

दरम्यान यावेळी बोलताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत जेष्ठ नेते चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. पुरोगामी विचाराने महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे या विचाराने त्यांनी काम केले. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली. महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असून त्यांच्या विचारांवर महाराष्ट्र शासनाचे काम सुरु आहे.

खासदार पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी गोरगरीबांच्या घरी ज्ञानाचा दिवा लागावा यासाठी मोफत शिक्षण दिले, इबीसी सवलत दिली. त्यातुन अनेकांना शिक्षणाची दारे खुली झाली. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर महाराष्ट्रात ज्यांना माणले जाते, ज्यांच्या पावलावर मस्तक ठेवल्यावर आनंद मिळतो. वयाच्या चौथ्या वर्षापासुन त्यांच्या अंतसमयापर्यंत मला त्यांनी सहवास दिला. माझ्या वडिलांप्रमाणे ज्यांनी मला आशिर्वादाने हे स्थान प्राप्त करुन दिले ते यशवंतराव चव्हाण आहेत. त्यांना मी अभिवादन करतो.