esakal | चक्रीवादळाचा मेढ्याला जबर तडाखा; शेतीसह 'महावितरण'चं मोठं नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL

मेढ्यात चक्रीवादळामुळे घरे, झाडे, शेतीसह महावितरणच्या वीज वाहिन्या, वीज पोलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

चक्रीवादळाचा मेढ्याला जबर तडाखा; शेतीसह 'महावितरण'चं मोठं नुकसान

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

मेढा (सातारा) : नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात (Damage Crop) नुकसान झाले. त्याचबरोबर महावितरणचेही (MSEDCL) नुकसान झाले आहे. जावळी तालुक्‍यात त्याचे प्रमाण जास्त आहे. विविध गावांतील विद्युतवाहक पोल पडले आहेत, तारा तुटल्या आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. (Major Damage To Crops In Medha Area Due To Cyclone Tauktae Satara Rain News)

चक्रीवादळामुळे घरे, झाडे, शेतीसह महावितरणच्या वीज वाहिन्या, विजेचे पोलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे, तसेच पावसामुळे (Rain) महावितरणच्या विद्युत वाहिन्यांचे बऱ्याच ठिकाणी नुकसान सुरूच आहे. त्यातच चक्रीवादळामुळे महावितरणच्या नुकसानीत अजूनच भर पडली. मेढा भागातील धावली, वागदरे, गवडी कुसुंबी, मालचौंडी, मेढा, बिभवी, वरोशी, तळोशी, वाळांजवाडी, केडंबे आदी गावांत विजेचे पोल पडून, तसेच वीजवाहक तारा तुटून महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे बऱ्याच ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित झाल्याचे प्रकार झाले.

मात्र, अशा परिस्थितीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून बऱ्याच ठिकाणचा विद्युतपुरवठा काही तासांतच सुरळीत केला. रात्री-अपरात्री चिखलातून, रानावनातून, सुविधांचा अभाव असताना, पाऊस व वादळाची पर्वा न करता जिवाची बाजी लावून हे कर्मचारी कार्य करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे अंधारलेला जावळीचा बराच भाग प्रकाशमय झाला आहे. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर इत्यादी जीवरक्षक प्रणाली चालण्यासाठी विद्युतपुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे. कोरोनाच्या स्थितीतदेखील गावोगावी जाऊन वायरमन आपली सेवा बजावताना दिसत आहेत. जनतेला प्रकाशमय करणारे प्रकाशदूतच सध्या प्रसिद्धीपासून अंधारात आहेत.

हेही वाचा: कऱ्हाडात शेतमालाचे कोट्यवधींचे नुकसान; लॉकडाउन, चक्रीवादळात पिकं भुईसपाट

चक्रीवादळाने बऱ्याच ठिकाणी विद्युत वाहिन्याचे पोल पडले असून, तारादेखील तुटल्या आहेत. सध्या बऱ्याच ठिकाणी विविध प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. मात्र, अशा परिस्थितीतही विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी काम करत आहेत. या कठीण काळात ग्राहकांनीही महावितरणला सहकार्य करावे.

-राहुल कवठे, शाखा अभियंता, मेढा

Major Damage To Crops In Medha Area Due To Cyclone Tauktae Satara Rain News

loading image