
कोरोनामुळे प्रशासनाने सीतामाई मंदिर परिसरात येण्यास मज्जाव करून संचारबंदी लागू केली होती.
दहिवडी (जि. सातारा) : दर वर्षी मकरसंक्रांतीदिवशी सुवासिनींच्या गर्दीने फुलून जाणारा सीतामाईचा डोंगर (कुळकजाई, ता. माण) यावर्षी सुवासिनींविना सुनासुना होता. सीतामाईसमोर वाणवसा घेण्याच्या ओढीने आलेल्या सुवासिनींनी तिथून जवळच असलेल्या श्री खंडोबा मंदिरासमोर वाणवसा घेतला.
श्री सीतामाईच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण अशी भावना महिलांत असल्यामुळे या ठिकाणी वाणवसा घेण्यासाठी सुवासिनी गर्दी करतात. मात्र, कोरोनामुळे प्रशासनाने सीतामाई मंदिर परिसरात येण्यास मज्जाव करून संचारबंदी लागू केली होती. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सीतामाई यात्रा रद्द झाली असून, मंदिर बंद आहे हे समजल्यामुळे बहुतांशी सुवासिनींनी इकडे येणे टाळले होते. त्यामुळे या संपूर्ण परिसरात निरव शांतता होती. मात्र, काही सुवासिनी या सीतामाईचे दर्शन मिळेल, या भोळ्या अपेक्षेने येथे आल्या होत्या.
Gram Panchayat Election : खंडाळा तालुक्यात महिलाराज; तब्बल 84 महिलांची बिनविरोध निवड
फलटणकडून डोंगर चढून काही सुवासिनी येत होत्या, तर कुळकजाईकडून वाहनाने मंदिराजवळ पोचल्या होत्या. मात्र, पोलिस बंदोबस्त असल्यामुळे सीतामाईचे दर्शन मिळत नसल्यामुळे सीतामाईच्या ओढीने आलेल्या या सुवासिनींचा हिरमोड होत होता. कशीतरी मनाची समजूत घालून या सुवासिनी येथे लगतच असलेल्या श्री खंडोबा मंदिरासमोर बसून वाणवसा घेत होत्या. हळदी, कुंकू, हळकुंडे, खाऊची पाने, तिळगूळ यासह विविध वस्तूंचा वाणवसा देऊन व घेऊन आपली परंपरा पूर्ण करत होत्या. येथे असलेली शांतता, हिरवाई व मुबलक पाण्याच्या सोयीमुळे सोबत आणलेली शिदोरी येथेच संपवली जात होती अन् जड अंतःकरणाने दुरूनच सुवासिनी सीतामाईचा निरोप घेत होत्या. श्री सीतामाई देवस्थान ट्रस्टने ठिकठिकाणी यात्रा रद्द झाल्याचे फलक लावले होते. दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सांगवीत राजे, खासदार गटात अटीतटीची लढत; संजीवराजेंचीही प्रतिष्ठा पणाला!
संपादन : बाळकृष्ण मधाळे