काटेवाडीत फुलल्या झेंडूच्या बागा; दस-यात फुलांना मोठी मागणी

केशव कचरे
Saturday, 24 October 2020

सातारा जिल्ह्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील सासवड, पुरंदर, जेजुरी, जुन्नर या भागातही झेंडूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यावर्षी मात्र रोपे व बियाणांची वेळेवर उपलब्धता न झाल्याने दसरा व दिवाळीच्यादृष्टीने शेतकऱ्यांना लागवडीचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातही झेंडू लागवडीखालील क्षेत्रही कमी झाले आहे.

बुध (जि. सातारा) : दिवाळी, दसरा सणांच्या पार्श्वभूमीवर बुध, काटेवाडी परिसरात झेंडूच्या बागा फुलू लागल्या आहेत. डिस्कळ, ललगुण, काटेवाडी, राजापूर, वेटणे, फडतरवाडी, नागनाथवाडीसह बुध परिसरातील शेतकरी खरिपातील नगदी पीक म्हणून झेंडू फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. मात्र, यावर्षी कोरोनामुळे तालुक्‍यातील फुलशेतीला चांगलाच दणका बसला आहे. 

आधी लॉकडाउन व आता सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे फुलशेती बहरलीच नाही. पुणे, मुंबई, पनवेल, नवी मुंबई येथील फुलबाजारात फुलांची आवक वाढल्यामुळे गेल्या तीन वर्षांत झेंडू पिकात येथील शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना मार्केटला विक्रीसाठी नेलेली फुले दराअभावी फेकून द्यावी लागली. हा कटू अनुभव गाठीशी असलेल्या बहुतांशी शेतकऱ्यांनी यावर्षी झेंडू लागवडीकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे. कोरोनामुळे मुंबई, पुणे, सोलापूर या शेतीमालाच्या प्रमुख बाजारपेठा बंद राहिल्यामुळे पहिल्या हंगामातील शेतीमाल शेतातच सडून गेल्याने शेतकऱ्यांचे हात अगोदरच पोळले आहेत. त्यात अद्यापही कोरोनाचे संकट दूर झाले नसल्याने बाजापेठा सुरू राहतीलच, याची कसलीच शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी नेहमीप्रमाणे झेंडूची लागवड केली नाही. तरीही काटेवाडी, करंजओढा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी धाडसाने झेंडूची लागवड केली आहे. 

सोयाबीनला सोन्याचा भाव; दर क्विंटलला चार हजारवर

सातारा जिल्ह्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील सासवड, पुरंदर, जेजुरी, जुन्नर या भागातही झेंडूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यावर्षी मात्र रोपे व बियाणांची वेळेवर उपलब्धता न झाल्याने दसरा व दिवाळीच्यादृष्टीने शेतकऱ्यांना लागवडीचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातही झेंडू लागवडीखालील क्षेत्रही कमी झाले आहे. यावर्षी झेंडूची लागवड निम्म्याने घटली असल्याने दसरा, दिवाळीत झेंडू फुलांना चांगला भाव राहील, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marigold Flower Garden In Kathewadi Area Satara News