यांत्रिक पध्दतीने जावळीत भातलावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mechanized paddy cultivation IN javali satara

यांत्रिक पध्दतीने जावळीत भातलावणी

कास - जावळी तालुक्यात भात हेच मुख्य पीक घेतले जाते. भात शेती करताना तरवा टाकणे, चिखल करणे, भातलावणी करणे आदी मुख्य कामे बैलजोडी आणि मजुरांवर अवलंबून असतात. ‍सध्‍या बैलजोड्या कमी झाल्या आहेत. मजुरांचीही कमतरता आहे. पाऊस सुरू असतानाच भातलावणी उरकावी लागते, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला येतो. यावर वरोशी येथील शेतकरी सुनील कासुर्डे यांच्या शेतात जावळीच्या कृषी विभागाने यांत्रिक पध्दतीने भात लावणीचा प्रयोग राबवला. यांत्रिकी पध्दतीने भात लावणीचा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैशाची बचत होणार आहे. भाताच्या नवनवीन वाणांचे उत्पादन वाढण्यासही त्यामुळे मदत होणार आहे.

वरोशी येथील सुनील तुकाराम कासुर्डे यांच्या शेतात कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून महाडीबीटी अंतर्गत भातलावणी यंत्र खरेदी केले आहे. या यंत्रास कृषी विभागामार्फत एक लाख रुपये अनुदान देण्यात आले. भातलावणी यंत्राचे पीकलागवड प्रात्यक्षिक व शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, शशिकांत घाडगे, कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे शास्त्रज्ञ डॉ. महेश बाबर, डॉ. संग्राम पाटील, मंडल कृषी अधिकारी संजय घोरपडे, ज्ञानदेव जाधव, कृषी पर्यवेक्षक विजय शिंदे, कृषी सहायक संतोष इंगवले, भानुदास चोरगे, वैभव डोईफोडे व परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. यानंतर शेतकरी कासुर्डे यांनी तयार केलेल्या रोपवाटिकेस भेट देऊन रोपवाटिका तयार करण्याची पद्धत, त्याचे व्यवस्थापन याबाबत कंपनी प्रतिनिधी फाटक यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.

यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना अनुदान

मंडल कृषी अधिकारी संजय घोरपडे यांनी कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी माहिती दिली. सुलभ अर्ज प्रक्रिया, निवडीची पद्धत, खरेदी, तपासणी व अनुदान वितरण आदीवर मार्गदर्शन केले. संबंधित प्रक्रिया कृषी विभागाच्या महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलद्वारे होत असल्याचे सांगून ते म्हणाले, ऑनलाइनमुळे अर्जदारास कार्यालयात हेलपाटेही मारावे लागत नसल्याने शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व पैशांची बचत होते. या योजनेत अत्यल्प, अल्प, महिला व मागासवर्गीय शेतकऱ्यांना खर्चाच्या ५० टक्के व इतर बहुभूधारक शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान दिले जाते.

Web Title: Mechanized Rice Cultivation In Jawali Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top