मेरुलिंग पठारावर पसरलाय फुलांचा गालिचा; पर्यटक प्रफुल्लित

प्रशांत गुजर
Friday, 30 October 2020

सातारा जिल्ह्यातील अत्यंत देखणे असे येथील श्री क्षेत्र मेरुलिंग मंदिर, टेबललॅण्डसारखे पठार आणि निसर्गरम्य वातावरणात उमललेली विविध जातीची फुले असा निसर्गाचा अद्‌भूत चमत्कार असलेले व त्रिवेणी संगम असलेले हे ठिकाण विकसित झाले पाहिजे अशी पर्यटकांची मागणी हाेत आहे.

सायगाव (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात पर्यटनाचा "क' दर्जा प्राप्त झालेल्या श्री क्षेत्र मेरुलिंगच्या विस्तीर्ण पठारावर आता कासप्रमाणे फुलांचे गालिचे बहरू लागल्याने पर्यटकांचा लोंढा या पठाराकडे वाढू लागला आहे.
 
जावळी तालुक्‍यात समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार किलोमीटर उंचीवर असणाऱ्या श्री क्षेत्र मेरुलिंगला जाताना मोरखिंड येथून चालत गेल्यास घाटातून जाताना ठिकठिकाणी विविध जातीची फुले, फुलांचे गालिचे पाहायला मिळतात. कासप्रमाणेच या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारच्या फुलांच्या जाती आहेत. त्याचबरोबर 400 वर्षांपूर्वीचे श्री क्षेत्र मेरुलिंगचे मंदिर पाहावयास मिळते. हे मंदिर मजबूत तटबंदी व दगडी बांधकामामुळे खूपच आकर्षक आहे. या मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या "बंडा' नावाच्या महाकाय पठारावर कासप्रमाणे लाल, हिरवे, निळे, जांभळ्या रंगांची फुले आढळून येतात. त्यामुळे पर्यटकांना हा परिसर आकर्षित करू लागला आहे.

जिल्ह्यात तब्बल 600 व्यावसायिकांची उपासमार, बॅंड वादक रस्त्यावर
 
कास पठाराप्रमाणे या ठिकाणीही मिकीमाउस, करडू, कवला, सोनटिकली, निलवंती अशा अनेक विविध प्रकारच्या जातीची फुले निसर्गप्रेमींना आकर्षित करू लागली आहेत. या फुलांबरोबर येथील निसर्गरम्य अल्हाददायक वातावरणही भुरळ घालत आहे. हे ठिकाण पाचगणीच्या टेबललॅण्डची आठवण करून देणारे आहे. तेथून कण्हेर धरणाचा जलाशय व परिसरातील असणारे सगळे गड, किल्ले द्रष्टिक्षेपात येतात. दाट धुके, नागमोडी आकाराचे वळणदार रस्ते, हिरवीगार गर्द झाडी, पाण्याचे खळखळणारे झरे, ठिकठिकाणी असणारे छोटे-मोठे धबधबे आदींमुळे निसर्गाचा एक अद्‌भूत चमत्कार या ठिकाणी पाहावयास मिळतो. येथे जाण्यासाठी मंदिरापर्यंत डांबरी रस्ता आहे, तर बंडा पठार येथून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. निसर्गाचा हा अनमोल ठेवा नजरेत आल्याने दररोज शेकडो पर्यटक या ठिकाणी भेटी देत आहेत.

सावधान! कुकुडवाड-मायणी मार्ग बनतोय जीवघेणा, संरक्षक कठड्यांचीही दुरवस्था

सातारा जिल्ह्यातील अत्यंत देखणे असे येथील श्री क्षेत्र मेरुलिंग मंदिर, टेबललॅण्डसारखे पठार आणि निसर्गरम्य वातावरणात उमललेली विविध जातीची फुले असा निसर्गाचा अद्‌भूत चमत्कार असलेले व त्रिवेणी संगम असलेले हे ठिकाण विकसित झाले पाहिजे. 

- विक्रम कोरडे, पर्यटक, वाई

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meruling Attracts Tourisits From Maharashtra Satara