..अखेर माण तालुक्‍याच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी; युवकांना मोठा दिलासा

विशाल गुंजवटे
Saturday, 22 August 2020

म्हसवड, धुळदेव या ठिकाणी तीन हजार दोनशे हेक्‍टरमध्ये म्हणजेच आठ हजार एकर क्षेत्रात ही एमआयडीसी उभारली जाणार आहे. यात सरकारी जमीन 300 हेक्‍टर आहे तर उर्वरित 2900 हेक्‍टर क्षेत्र जमीन शेतकऱ्यांची आहे. या भागाचा फॅक्‍टर किती लागेल, त्यानुसार शेतकऱ्यांना दर मिळणार आहे. दर निश्‍चित झाल्यानंतर जमीन संपादनाची रक्कम देऊन, हे क्षेत्र ताब्यात घेण्यात येईल.

बिजवडी (जि. सातारा) : दुष्काळी माण तालुक्‍यात जलसंधारणाचे मोठे काम उभे राहिले आहे. त्यामुळे माणचे चित्र हळूहळू बदलू लागले आहे. आता त्यात आणखी भर पडून म्हसवड व धुळदेव याठिकाणी आठ हजार एकर क्षेत्रात `एमआयडीसी'चा प्रकल्प उभारला जाणार आहे. लवकरच जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती `एमआयडीसी'चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. 

सुभेदार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात एमआयडीसी'चे एक क्षेत्र विकसित करू, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ संकल्पीत अधिवेशनात केली होती. त्याची आज पूर्तता होत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे प्रधान सचिव रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ अनबलगन यांचेही विशेष प्रयत्न आहेत. `एमआयडीसी'मुळे माण, खटाव, जत, आटपाडी, सांगोलासारख्या दुष्काळी तालुक्‍यातील युवकांना रोजगार मिळून, उद्योग उभारण्याची संधी मिळेल. या हेतूने आम्ही म्हसवड, धुळदेवमधील सलग क्षेत्राची पाहणी केली होती. `एमआयडीसी'साठी ही जागा योग्य असल्याची शिफारस आमच्या समितीने वरिष्ठांकडे केली. या प्रकल्पासाठी पाण्याचा प्रश्न मोठा होता. यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

दहा वर्षापासून हे कुटुंब शेतामधील मातीतूनच साकारतात गणपती - 

म्हसवड, धुळदेव या ठिकाणी तीन हजार दोनशे हेक्‍टरमध्ये म्हणजेच आठ हजार एकर क्षेत्रात ही एमआयडीसी उभारली जाणार आहे. यात सरकारी जमीन 300 हेक्‍टर आहे तर उर्वरित 2900 हेक्‍टर क्षेत्र जमीन शेतकऱ्यांची आहे. या भागाचा फॅक्‍टर किती लागेल, त्यानुसार शेतकऱ्यांना दर मिळणार आहे. दर निश्‍चित झाल्यानंतर जमीन संपादनाची रक्कम देऊन, हे क्षेत्र ताब्यात घेण्यात येईल. महिनाभरात चाप्टर सहाचे नोटिफिकेशन होऊन, शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के पडतील. नोटिफिकेशन झाले, की संयुक्त मोजणी करून, क्षेत्र निश्‍तित केले जाईल. नंतर 32 / 1 चे नोटिफिकेशन करून, एका वर्षाच्या कालावधीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल. नोटिफिकेशन झाले की `एमआयडीसी'मार्फत केंद्राकडे निधीसाठी प्रस्ताव दाखल केला जाईल. यात `एमआयडीसी'चा प्लॅन बनवला जाईल, असेही सुभेदार यांनी सांगितले. 

कोरोनामुक्तीच्या जनजागृतीचे फलक घेऊन जावळीत मंडळांनी केले श्री चे आगमन -

माणचा चेहरा- मोहरा बदलेल 

हा प्रकल्प पूर्णत्वाला आल्यानंतर दहा वर्षात माण तालुक्‍याचा चेहरामोहरा बदललेला दिसेल. त्यामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाचे चटके सहन करणारे नागरिक निश्‍चितच आनंदोत्सव साजरा करतील, तसेच येथील स्थानिक युवकांनाही रोजगार मिळण्यास चालना मिळणार असून बेरोजगारीचे प्रमाण कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे गावांचा विकासही होण्यास मदत मिळणार आहे, असे आशा सुभेदार यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIDC Will Be Set Up In An Area Of 8,000 Acres In Maan Taluka