पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; आमदार पाटलांच्या अधिकाऱ्यांना सूचना

रविकांत बेलोशे
Thursday, 22 October 2020

परतीच्या पावसाने महाबळेश्वर तालुक्‍यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता ठामपणे उभे राहावे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत. पंचनाम्यापासून कुणीही वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी, असे आमदार मकरंद पाटील यांनी नमूद केले.

भिलार (जि. सातारा) : परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार मकरंद पाटील महाबळेश्वर तालुक्‍यातील आंब्रळ येथे शेतीच्या बांधावर पोचले. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. महाबळेश्वर तालुक्‍यातील एकही शेतकरी पंचनाम्यावाचून वंचित राहता कामा नये याची काळजी घ्या, अशा सक्त सूचना महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. 

यावेळी यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, संतोष आंब्राळे, दिलीप आंब्राळे, अशोक दुधाणे उपस्थित होते. परतीच्या पावसाने महाबळेश्वर तालुक्‍यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता ठामपणे उभे राहावे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत. 

शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; सरकारविरोधात दरेकर, शिवेंद्रसिंहराजे आक्रमक

पंचनाम्यापासून कुणीही वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी, असे आमदारांनी नमूद केले. आमदार पाटील यांना माहिती देताना श्री. राजपुरे म्हणाले, ""स्ट्रॉबेरीला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी बटाटा, वाटाणा व हायब्रीड पिके घेतली होती. परंतु, त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्‍यातील शेतकरी अल्पभूधारक असून शासनाचे निकष शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहेत.'' यावेळी कृषी अधिकारी सुनील साळुंखे, कृषी पर्यवेक्षक दीपक बोर्डे, मंडलाधिकारी विजय ढगे, विस्तार अधिकारी सुनील पार्टे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Patil Assures Help To Affected Farmers In Ambral Satara News