esakal | आरोग्य सुविधा आमदार निधीतून देऊ; शशिकांत शिंदेंची खटावात ग्वाही

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde
आरोग्य सुविधा आमदार निधीतून देऊ; शशिकांत शिंदेंची खटावात ग्वाही
sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज : खटाव तालुक्‍यातील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी जिल्हा ते राज्य पातळीवर पाठपुरावा करू. आमदार निधीच्या माध्यमातूनही आरोग्यविषयक सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्‍यातील कोरोना स्थितीचा आढावा बैठक आज झाली. त्या वेळी आमदार शिंदे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, सभापती जयश्री कदम, उपसभापती हिराचंद पवार, माजी सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कचरे, नंदकुमार मोरे, शिवाजीराव सर्वगोड, सदस्य संतोष साळुंखे, आनंदराव भोंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार शिंदे म्हणाले, ""वडूज, पुसेगाव, खटाव, मायणी येथे सध्या कोविड सेंटर सुरू आहेत. मात्र, बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हास्तरावरील कोविड सेंटरवर ताण येत आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने तालुका पातळीवरच नव्या कोविड सेंटरचा प्रस्ताव करावा. कलेढोणच्या कुटीर रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी. वडूजच्या लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण रुग्णालयातील ऑक्‍सिजन बेडची संख्या वाढवावी. औंध, पुसेसावळी येथे कोविड सेंटरचा प्रस्ताव करावा. पुसेगाव, खटाव येथील कोविड सेंटरला अखंडित वीजपुरवठा करावा.''

नगराध्यक्षपदासाठी चूरस वाढली; शिवेंद्रसिंहराजेंवर लक्ष

उपाध्यक्ष विधाते म्हणाले, ""जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पडळ व गुरसाळे येथे बांधलेल्या नवीन इमारतीमध्ये लवकरच कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. कोरोना स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. भविष्यकालीन उपाययोजना म्हणून पुसेगाव येथील पब्लिक स्कूल, खटाव येथे मुलांचे वसतिगृह, औंध, मायणी याठिकाणी ऑक्‍सिजन बेडचे नियोजन करण्यात आले आहे.'' संदीप मांडवे यांनी कलेढोण येथील कुटीर रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली. सुनीता कचरे यांनी बुध, ललगुण भागांत बाधितांची संख्या लक्षात घेऊन डिस्कळ येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली. गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी स्वागत केले. सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार यांनी प्रास्ताविक केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख यांनी कोरोना स्थितीबाबत माहिती दिली.

Edited By : Balkrishna Madhale