ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्‍न हिवाळी अधिवेशनात सोडवणार : शशिकांत शिंदे

राजेंद्र वाघ
Monday, 19 October 2020

या ठिकाणी उपचार घेणाऱ्या 200 रुग्णांसाठी रेमडिसिव्हर इंजेक्‍शनसह अन्य औषधे आमदार शशिकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत देण्यात आली.

कोरेगाव : येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना केअर सेंटरची क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला होता, त्यास तत्काळ मान्यता मिळाली. आरोग्य विभागाने कमीत कमी कालावधीत आयसीयूसह उभारलेला विस्तारित कक्ष आता कार्यान्वित होत असल्याने या ठिकाणी कोरोनाबाधितांना विनाविलंब वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
 
येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना केअर सेंटरमध्ये नव्याने उभारलेला सुसज्ज विस्तारित कक्ष, आयसीयू सेंटरचे उद्‌घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, डॉ. संजय चिवटे, डॉ. नीलेश दबडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, रुग्णकल्याण समितीचे सदस्य डॉ. गणेश होळ उपस्थित होते.

मैत्रीच्या विश्वासावर निवडणूक ठामपणे लढवली आणि जिंकलीही : श्रीनिवास पाटील

टप्प्याटप्प्याने रुग्णांसाठी आणखी औषधे पुरवणार असल्याचे तसेच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या रुग्णालयाशी संबंधित प्रश्‍न सोडवून घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. चव्हाण यांनी विस्तारित कक्षाबद्दल माहिती दिली. या कक्षामध्ये अत्यवस्थ रुग्णांसाठी विशेष सुविधा आहे. प्रत्येक बेडला स्वतंत्र मॉनिटर आहे, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. होळ यांचेही भाषण झाले. दरम्यान, या ठिकाणी उपचार घेणाऱ्या 200 रुग्णांसाठी रेमडिसिव्हर इंजेक्‍शनसह अन्य औषधे आमदार शशिकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLC Shashikant Shinde Assures To Solve Problem Of Koregaon Hospital Satara News