Karad | साखर आयुक्तांबरोबर सोमवारी बैठक : पंजाबराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखर आयुक्तांबरोबर सोमवारी बैठक : पंजाबराव पाटील

साखर आयुक्तांबरोबर सोमवारी बैठक : पंजाबराव पाटील

कऱ्हाड - बळीराजा शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर तोडग्यासाठी साखर आयुक्तांबरोबर सोमवारी (ता. १५) बैठक घेण्याचे वतीने येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या आज पाचव्या दिवशी प्रशासनाबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरवण्यात आले. दरम्यान, कऱ्हाडचे नेते दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देतात. मात्र, त्यांच्या भूमीत चाललेल्या आंदोलनाकडे ते पाहात नाहीत, हे दुर्दैवच आहे, अशी टीका ‘बळीराजा’चे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

या बैठकीला पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उपप्रादेशिक साखर संचालक संजय गोंधळी, साखर लेखा परीक्षक डी. एन. पवार, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते. या बैठकीबाबत माहिती देताना श्री. पाटील म्हणाले, ‘‘आम्ही केलेल्या मागण्या अधिकाऱ्यांनी ऐकल्या. मात्र, जबाबदारी घेतली नाही. त्यासाठी आता साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याबरोबर सोमवारी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामध्ये तोडगा निघेल, अशी आशा आहे. कऱ्हाडला झालेल्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बैठकीसाठी वेळ दिली होती. त्यामुळे एकरकमी एफआरपीसाठी आम्हाला आंदोलन करायची वेळ आणून देऊ नका, असे आम्ही प्रशासनाला सांगितले आहे.’’

बी. जी. पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी हक्काचे पैसे मागायला आंदोलन करायला लागते, ही शोकांतिका आहे. एफआरपी आणि साखरेसंदर्भातील कायद्यांचा आम्ही वापर केला तर कारखानदारांना सळो की पळो होईल. त्यामुळे कारखानदारांनी तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.’’ दरम्यान, आंदोलनाला आज विविध संघटना, मनसेने पाठिंबा दिला.

शेतकरी संघटना फुटल्या आहेत, त्यामुळे आंदोलन होणार नाही, असे काहीजण गैरसमज पसरवत आहेत. मात्र, ‘बळीराजा’च्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सर्व संघटना एकत्र येतात, हे आम्ही दाखवून दिले आहे.

- पंजाबराव पाटील, केंद्रीय अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना

loading image
go to top