Satara News : रामराजेसाहेब तुम्हाला दुःख कशाचे होतेय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Ranjitsingh Naik-Nimbalkar criticize Ramraje Naik-Nimbalkar satara development works politics

Satara News : रामराजेसाहेब तुम्हाला दुःख कशाचे होतेय

आसू : माढा लोकसभा मतदारसंघाचा पर्यायाने फलटणचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी कोट्यवधी रुपयांची अनेक विकासकामे मंजूर केली आहेत. त्यामुळे रामराजेसाहेब तुम्हाला दुःख कशाचे होत आहे, मी करत असलेल्या विकासकामाचे का? असा सवाल खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी रामराजे नाईक- निंबाळकर यांना केला.

येथे जलजीवन मिशन योजना उद्‌घाटन व भव्य नागरी सत्कार समारंभप्रसंगी खासदार नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण कृती समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले,

हनुमंतराव मोहिते, भाजपचे फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, नगरसेवक अशोक जाधव, अनुप शहा, अमित रणवरे, अमरसिंह निंबाळकर, शिवसेनेचे विराज खराडे, हर्षल पवार, विठ्ठल माने, सुशांत निंबाळकर, अमोल सस्ते, युवा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार निंबाळकर म्हणाले, ‘‘नीरा- देवघरचे बारामतीला जाणारे पाणी बंद करून माझ्या माढा लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांना कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केले. फलटण- पंढरपूर रेल्वे, ५० हजार कोटींचा बंगळूर महामार्ग, बुलेट ट्रेन, फलटण- बारामती, फलटण- दहिवडी- सांगली रस्ता, फलटणला सेशन कोर्ट, झिरपवाडीचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय, फलटण शहरात शंभर कोटींचा रस्ता, नाईकबोमवाडीची एमआयडीसी आदी कामे मंजूर करून माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.

रामराजेसाहेब तुम्ही बारामतीकरांच्या हट्टपायी गेली २५ वर्षे फलटणच्या जनतेला रडवले. तालुक्यातील दूध संघ, मालोजीराजे बँक, श्रीराम साखर कारखाना दुसऱ्याला चालवायला देताय. स्वराज्य कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचे सर्व पैसे आम्ही दिलेले आहेत. आमच्यावर खोटे आरोप करू नका. अन्यथा तसा शेतकरी दाखवा आम्ही राजकारण बंद करू.’’

या वेळी ॲड. नरसिंह निकम, विश्वासराव भोसले, जयकुमार शिंदे, विशालसिंह माने, अनुप शहा यांचीही भाषणे झाली. दिलीपसिंह माने यांनी प्रास्ताविक केले. आनंद पवार यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी भाजपच्या विविध विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Satarasatara corporation