
जावळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेती, ताली, घरांचे, विहिरींचे मोठे नुकसान झाले आहे.
'अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी प्रयत्न करणार'
केळघर (सातारा) : जावळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेती, ताली, घरांचे, विहिरींचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे (Central Government) दाद मागणार आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असून, जिल्ह्यातील नुकसानीची माहिती केंद्र सरकारला देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil) यांनी दिली.
केळघर भागातील अतिवृष्टीमुळे नुकसानीत झालेल्या डांगरेघर, पुनवडी, केडंबे, बाहुळे, भुतेघर, वाळंजवाडी, बोंडारवाडी या गावांची नुकतीच खासदार पाटील यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सारंग पाटील, प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, विस्ताराधिकारी ए. पी. पवेकर, नारायण शिंगटे, शिवाजीराव देशमुख, सुरेश पार्टे, राजेंद्र जाधव, आतिष कदम, संकेत पाटील, सुरेश कदम, तलाठी मकरध्वज डोईफोडे, ग्रामसेवक अमोल गायकवाड यांची उपस्थिती होती.
हेही वाचा: केंद्र, राज्य सरकारची मदत देऊ; जानकरांचं पूरग्रस्तांना आश्वासन
खासदार पाटील म्हणाले,‘‘ अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करावेत. शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार आहे. भूस्खलन झालेल्या गावांतील ग्रामस्थांची यादी करून बाधित लोकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नगदी पिके वाहून गेली आहेत, त्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जास्त मदत मिळवून देऊ. केंद्र सरकारकडून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.’’ परिसरातील वाहून गेलेल्या पुलांची पाहणी करून खासदार पाटील यांनी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या वेळी खासदार पाटील यांनी परिसरातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांकडून नुकसानीची माहिती घेतली. जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी दिली. यावेळी खासदार पाटील यांनी परिसरातील नुकसानीची पाहणी करून गावागावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी गावोगावचे सरपंच, उपसरपंच, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Mp Shriniwas Patil Visits Dangreghar Punwadi Kedambe Bahule Valanjwadi Villages
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..