व्यावसायिकांची घरपट्टी माफ करा, उदयनराजे गरजले

उमेश बांबरे
Wednesday, 4 November 2020

कोरोना महामारीमुळे एप्रिल ते जूनअखेर पूर्णपणे लॉकडाउन झाले होते. या कालावधीत व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा ज्या प्रमाणे जगला पाहिजे, त्याप्रमाणे व्यापारी तरला पाहिजे. तरच समाज टिकेल, अशी आमची धारणा असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

सातारा : सातारा पालिका हद्दीतील व्यावसायिक मिळकतींना एप्रिल ते जूनअखेरच्या तीन महिन्यांच्या काळातील घरपट्टी माफ करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, तसेच त्याची अटीशर्तींसह प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अशी सूचना आम्ही पालिका प्रशासनास केल्या आहेत, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. 

उदयनराजे भोसले यांनी पत्रकात नमूद केले की, कोरोना महामारीमुळे एप्रिल ते जूनअखेर पूर्णपणे लॉकडाउन झाले होते. या कालावधीत व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यांनी भाड्याने गाळे घेऊन व्यवसायातून आर्थिक उन्नती करण्याचे नियोजन केले होते. त्यांचे तर कंबरडेच मोडले आहे. व्यापारी, व्यावसायिक हा त्या-त्या क्षेत्राच्या विकासाचा केंद्रबिंदु असतो. व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक धाडसामुळेच एकंदरीत चलन-वलनात फार मोठी उलाढाल होऊ त्या त्या क्षेत्राचा विकास होत असतो. छोट्या मोठ्या व्यावसायिक कारणांमुळे हातावरचे पोट असणाऱ्यांना रोजगार मिळत असतो. म्हणूनच जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा ज्या प्रमाणे जगला पाहिजे, त्याप्रमाणे व्यापारी तरला पाहिजे. तरच समाज टिकेल अशी आमची धारणा आहे. 

पालिका उपाध्यक्षाची निवड गुरुवारी; उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष 

कोरोना महामारीत गेल्या सात-आठ महिन्यांपासून सर्वांचेच आर्थिक, मानसिक, सामाजिक, शारिरीक खच्चीकरण होत असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये व्यापारी-व्यावसायिक पूर्णपणे भरडले आहेत. ज्यांचे व्यवसायच लॉकडाउनच्या काळात सुरू नसल्याने त्यांना त्या काळात घरपट्टीत सूट देऊन दिलासा दिला पाहिजे. या भावनेतून सातारा पालिकेच्या हद्दीतील व्यावसायिक मिळकतींच्या घरपट्टीत एप्रिल ते जून अखेरच्या तीन महिन्यांच्या काळातील घरपट्टी माफ करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, अशा सूचना उदयनराजेंनी पालिका प्रशासनास केल्या आहेत. व्यापारी बंधुंना त्यांच्या अडचणीच्या काळात पालिकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Udayanraje Bhosale Demand For Waiver Of Three Months House Rent On Commercial Properties