लोणंदमधील राडारोडा हटविला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mud from Lonand bus stand cleaned Shelke couple

लोणंदमधील राडारोडा हटविला

लोणंद - येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेळके- पाटील व त्यांच्या पत्नी नगरसेविका दीपाली शेळके- पाटील यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून स्वखर्चाने येथील बस स्थानकाच्या आवारात झालेला चिखलाचा राडारोडा ट्रॅक्टरच्या साह्याने दूर करून प्रवासी वर्गाला काहीसा दिलासा दिला आहे.

दै. ‘सकाळ’च्या ता. १५ रोजीच्या अंकात ‘लोणंद बस स्थानक बनले तळे’ या मथळ्याखाली छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध होताच आज येथील सामाजिक कार्यकर्ते व भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य संदीप शेळके व त्यांच्या पत्नी नगरसेविका दीपाली शेळके यांनी सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने ट्रॅक्टर लावून बस स्थानकाच्या आवारातील चिखल व राडारोडा हटवून प्रवाशांना काहीसा दिलासा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोणंद बस स्थानक आवारात सर्वत्र पाणी साचून अक्षरक्षः तळ्याचे स्वरूप आले होते. पालखी काळात बस स्थानक आवारात मातीमिश्रित मुरूम टाकण्यात आल्याने सर्वत्र चिखलही मोठ्या प्रमाणावर झाला होता. प्रवाशांना, तसेच वृद्ध, आजारी, लहान मुले, विद्यार्थी यांना पाणी व चिखलातूनच कशीबशी वाट काढत ये-जा करावी लागत होती. त्यामुळे प्रवासी वर्गातून एसटी महामंडळाच्या या गजब कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता, तरीही एसटी महामंडळाने कोणतीच हालचाल केली नाही.

प्रवाशांची डोळ्यासमोर होणारी त्रेधातिरपीट पाहात बसण्याची भूमिकाच एसटी महामंडळाने घेतली. मात्र, शेळके दांपत्यांनी प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन पुढे होऊन स्वखर्चातून बस स्थानक आवारातील चिखलाचा राडारोडा आज हटवून प्रवाशांना दिलासा दिला आहे. त्यामुळे शेळके- पाटील दांपत्याचे प्रवासी व नागरिकांतून अभिनंदन केले जात आहे. मात्र, प्रवासी वर्गाची चिखलाच्या राड्यातून कायमची सुटका करण्यासाठी एसटी महामंडळाने लोणंद बस स्थानक आवाराचे त्वरित काँक्रिटीकरण अथवा डांबरीकरण करण्याची मागणीही प्रवासी वर्गातून होत आहे.

Web Title: Mud From Lonand Bus Stand Cleaned Shelke Couple

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top