esakal | म्हसवड : श्री नागोबा देवाची यात्रा यंदा रद्द; पाच जानेवारीपर्यंत मंदिर राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसवड : श्री नागोबा देवाची यात्रा यंदा रद्द; पाच जानेवारीपर्यंत मंदिर राहणार बंद

येथील यात्रा कालावधीत श्री नागोबा देवस्थान मंदिर बंद राहणार असून, मंदिर व परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी दिला.

म्हसवड : श्री नागोबा देवाची यात्रा यंदा रद्द; पाच जानेवारीपर्यंत मंदिर राहणार बंद

sakal_logo
By
सलाउद्दीन चाेपदार

म्हसवड (जि. सातारा) : धनगर समाजाचे आराध्य दैवत संबोधले जाणाऱ्या येथील श्री नागोबा देवस्थानाची यात्रा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात परिचित असलेला जातिवंत खिलार जनावरांचा वार्षिक बाजार 29 डिसेंबर ते पाच जानेवारी या कालावधीत होता. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा व बाजार रद्द करण्यात आला आहे. या कालावधीत श्री नागोबा मंदिर बंद राहणार असल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

श्री नागोबा यात्रा ही जातिवंत खिलार जनावरांची यात्रा, कुस्त्यांचा आखाडा, धनगरी ओव्यांचा कार्यक्रम, त्याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांतील 50 गावांतील गजीनृत्ये यासाठी प्रसिध्द आहे. यात्रा कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक भागातून धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. परंतु, कोरोनाच्या साथीमुळे आरोग्याच्या सुरक्षतेच्यादृष्टीने यावर्षी शासनाने राज्यातील सर्व यात्रा रद्द केल्या आहेत. त्यामुळे येथील नागोबा देवस्थान यात्राही यंदा भरणार नाही. येथील श्री नागोबा देवस्थानच्या मंदिरातील धार्मिक कार्यक्रम प्रशासनाच्या देखरेखीखाली पुजारी मंडळीच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. शासनाच्या आदेशाने श्री नागोबा यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे "श्रीं'च्या दर्शनासाठी भाविकांनी येऊ नये तसेच या देवस्थानच्या यात्रेत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांनी जनावरे विक्रीस आणू नयेत, असे आवाहन श्री नागोबा देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टोल चुकविणा-यांच्या 'आयडिया' फसल्या; पोलिस खात्यावर व्यवस्थापन नाराज 

येथील यात्रा कालावधीत श्री नागोबा देवस्थान मंदिर बंद राहणार असून, मंदिर व परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी दिला.

सामान्यांची कामे हाेत नसल्याने तहसीलदारांवर शिवसैनिक नाराज

Edited By : Siddharth Latkar

loading image