Tiranga: कर भरणाऱ्या मिळकतधारकांना पालिका देणार राष्ट्रध्वज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian National Flag

Tiranga : कर भरणाऱ्या मिळकतधारकांना पालिका देणार राष्ट्रध्वज

सातारा - स्‍वातंत्र्यां‍च्‍या अमृतमहोत्‍सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्‍या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पूर्ण घरपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांना राष्‍ट्रध्‍वज भेट देण्‍याची योजना जाहीर केली होती. या योजनेत शहरातील ८ हजार २१० मिळकतधारकांनी पालिकेकडे पूर्ण घरपट्टी जमा करत सहभाग नोंदवला आहे. या मिळकतधारकांना राष्‍ट्रध्‍वज भेट देण्‍यासाठी पालिकेने शासनाकडे १० हजार राष्‍ट्रध्‍वजांची मागणी नोंदवली आहे. राष्‍ट्रध्‍वज उपलब्‍धतेनुसार नागरिकांना त्‍याचे वितरण सुरू केले आहे.

स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवी वर्षानिमित्त १३ ते १५ या कालावधीत संपूर्ण देशभर ‘हर घर तिंरगा’ अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानाला साताऱ्यात व्‍यापक स्‍वरूप यावे, यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने पालिकेने पूर्ण घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना राष्‍ट्रध्‍वज भेट देण्‍याचे जाहीर केले. गेले अनेक महिने थकबाकी वसुलीसाठी पालिकेची तीन पथके कार्यरत होती. मालमत्ता जप्‍तीसह नळ कनेक्शन तोडण्‍यावर पथकाने भर दिला होता. तीन महिने अविरत काम करूनही पालिकेच्‍या थकबाकीपैकी अल्‍पशी रक्कम वसूल झाली होती.

पूर्ण घरपट्टी भरणाऱ्यांना राष्‍ट्रध्‍वज भेट देण्‍याची घोषणा पालिकेने केली होती. पालिकेचे उत्‍पन्न वाढण्‍याबरोबरच ‘हर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांचा सहभाग वाढेल, असा दुहेरी हेतू पालिकेचा या योजनेमागे होता. यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला असून, गेल्‍या पंधरा दिवसांत पालिकेच्‍या थकबाकीतील १५ टक्के रक्कम वसूल झाली आहे. आत्तापर्यंत ८ हजार २१० हून अधिक मिळकतधारकांनी पूर्ण घरपट्टी पालिकेकडे जमा केली आहे. यामुळे पालिकेच्‍या तिजोरीत ऑगस्‍ट महिन्‍यात सुमारे दोन कोटीहून अधिक रक्कम जमा होणार आहे.

राष्‍ट्रध्‍वज वितरणासाठी केंद्रे

पूर्ण कर भरणाऱ्या मिळकतधारकांना राष्‍ट्रध्‍वज भेट देता यावेत, यासाठी पालिकेने शासनाकडे १० हजार राष्‍ट्रध्‍वजांची मागणी नोंदवली आहे. हे ध्‍वज टपाल विभागाच्‍या माध्‍यमातून पालिकेस मिळणार असून त्‍यासाठीची प्रक्रिया सध्‍या सुरू आहे. नागरिकांच्‍या सुविधेसाठी पालिकेने मुख्‍य कार्यालयासह, शाहूपुरी, विलासपूर, गोडोली, सदरबझार येथेही राष्‍ट्रध्‍वज वितरण केंद्रे सुरू केली आहेत.

Web Title: National Flag Will Be Givenn Satara Municipality To Income Earners Who Pay Tax

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..