पक्षसंघटनेसाठी वेळ देणा-यांनाच आता 'राष्ट्रवादी'त संधी

उमेश बांबरे
Thursday, 15 October 2020

आता नव्याने मुलाखती घेऊन पक्षसंघटनेसाठी वेळ देणाऱ्या व नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडी केल्या जाणार आहेत.

सातारा : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची जिल्हा व सर्व तालुक्‍यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी कार्यवाही केली आहे.

युवकचे अनेक पदाधिकारी पदे घेऊन पक्षसंघटनेसाठी वेळ देत नव्हते. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना बदलण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतला आहे. लवकरच नव्याने मुलाखती घेऊन पक्ष व संघटनेसाठी वेळ देणाऱ्यांची कार्यकारिणीवर निवड केली जाणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांनी जिल्हा कार्यकारिणी, सर्व तालुकाध्यक्ष तसेच तालुका कार्यकारिणी बरखास्त केली आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांना बडतर्फ करा 
 
आता नव्याने युवकची सर्व कार्यकारिणींची निवड होणार आहे. त्यासाठी पक्षासाठी वेळ देणारे तसेच युवकांच्या विविध प्रश्‍नांची जाण असलेले व त्यांच्यासाठी भूमिका घेऊन लढा देणाऱ्या युवकांना या संघटनेत संधी दिली जाणार आहे.

सावधान! चक्रीवादळ सातारा-वडूजमार्गे जाणार मुंबईला

आजपर्यंत अनेक जुने कार्यकर्ते युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षांसह इतर पदे अडवून बसले होते. प्रत्यक्ष पक्षसंघटनेसाठी योगदान देण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते. आता नव्याने मुलाखती घेऊन पक्षसंघटनेसाठी वेळ देणाऱ्या व नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडी केल्या जातील, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Congress Party Youth Cell Satara News