सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपत रंगणार सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP-Satara

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपत रंगणार सामना

सातारा - मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी स्वबळाची तयारी केली आहे; पण खरी लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसला अस्तित्व टिकविण्यासाठी झुंजावे लागेल. शिवसेनेची मंडळी पक्ष प्रमुखांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रवादीपुढे पाटण, कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेससोबत, तर माणमध्ये रासपसोबत युतीचा पर्याय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन काही ठिकाणी भाजप युती करण्याची शक्यता आहे. एकूणच राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा परिषदेतील सत्ता घेण्यासाठी भाजप व मुख्यमंत्री शिंदे गट सक्रिय आहेत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झाल्यानंतर आता इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या निवडणुकांत राष्ट्रवादी हाच प्रबळ पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल भाजप, शिवसेना व काँग्रेसची सदस्य संख्या आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या अनेक स्थित्यंतरांचा परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसतील. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिंदे गट- शिवसेना, रासप, रिपब्लिकन पक्ष हे सर्व पक्ष यावेळेस रिंगणात पाहायला मिळतील; पण प्रमुख पक्षांची पक्ष चिन्हावरच लढण्याची भूमिका आहे. त्यामुळे खरी लढत ही राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व शिवसेना यांच्यातच होईल, असेच चित्र आहे.

जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यात भाजपचे दोन खासदार, दोन आमदार आहेत, तर शिवसेनेचे दोन आमदार असून, ते मुख्यमंत्री शिंदे गटाकडे आहेत. काँग्रेसचा एकमेव आमदार आहे, तर राष्ट्रवादीचा एक खासदार, विधानसभेचे तीन व विधान परिषदेचे दोन आमदार आहेत.

राष्ट्रवादीची स्वबळाची भूमिका

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावर लढण्याची भूमिका आहे; पण पाटण, कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेसशी, तर माणमध्ये रासपशी आघाडीचा पर्याय आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेसाठी जय्यत तयारी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार खासदार श्रीनिवास पाटील, माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील एकत्र बसून रणनीती ठरवू शकतात. काँग्रेसही स्वबळाच्या तयारीत आहे. त्यांचे सात सदस्य होते. एकेकाळी जिल्हा परिषदेची सत्ता असलेल्या काँग्रेसला अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच यावेळीही जिल्हा परिषदेला हा पक्ष सामोरे जात आहे. काही ठिकाणी त्यांना राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा पर्याय आहे. आजपर्यंत गमावलेले २१ सदस्य परत मिळविण्यासाठी त्यांना झुंजावे लागेल.

भाजपकडून प्रमुख दावेदारी

राष्ट्रवादीविरोधात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जाते. यावेळी भाजपही स्वबळावर व पक्ष चिन्हावर लढण्याच्या तयारीत आहे. गरज असेल तर कोरेगाव, पाटणमध्ये मुख्यमंत्री शिंदे गट शिवसेनेसोबत युतीने निवडणूक लढावी लागणार आहे. भाजपची जिल्ह्यात वाढलेली ताकद व त्यांच्याकडे असलेले दिग्गज नेते मंडळींनी ताकद लावल्यास जिल्हा परिषदेची सत्ता भाजपही काबीज करू शकतो.

शिवसेनेची दोन शकले

शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. सध्या शिवसेनेचे जिल्हा परिषदेत दोन सदस्य आहेत. आता एकनाथ शिंदे गट व मूळ शिवसेना अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे; पण मूळच्या शिवसेनेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचीच तयारी करण्याची सूचना आहे. लवकरच प्रमुख नेते मंडळींची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बैठक होऊन त्यात काय आदेश निघणार? महाविकास आघाडीसोबत जाणार की स्वबळावर लढणार? हे ठरणार आहे.

कॉंग्रेस, रासपचीही तयारी

जिल्ह्यात माण, फलटण तालुक्यांत रासपची ताकद आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काही जागांबाबत राष्ट्रवादीकडून आघाडीची शक्यता आहे. कॉंग्रेसही विस्कळीत आहे. त्यामुळे कॉंग्रेसला सध्याच्या स्वतःच्या ताकदीवर सत्ता मिळविणे अवघड दिसते. महाआघाडी झाल्यास काही ठिकाणी कॉंग्रेसला यश मिळू शकले.

महाविकास सूत्र...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना अशी महाविकासच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणूक लढण्याचेही संकेत आहेत. पण, प्रत्येकाला अस्तित्व महत्त्वाचे आहे. यापूर्वी कधीही आघाडीसोबत निवडणुका झालेल्या नाहीत. सर्व जण स्वबळावर लढलेले आहेत. त्यामुळे भाजप, मुख्यमंत्री शिंदे गट शिवसेनेला रोखण्यासाठी महाविकासचे सूत्र येण्याची शक्यता आहे.

दोन्ही राजांची भूमिका महत्त्वाची

साताऱ्याचे दोन्ही राजे भाजपमध्ये आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते दोघे एकत्र राहणार का? हा प्रश्न आहे. गेल्या वेळी खासदार उदयनराजेंच्या गटाकडून जिल्हा राजधानी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढली गेली, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत होते. यावेळी दोघेही भाजपमध्ये असल्याने दोघांच्या भूमिकेवर सातारा तालुक्यातील चित्र अवलंबून आहे.

आकडे बोलतात...

६४ - एकूण सदस्य संख्या

४१ - राष्ट्रवादी काँग्रेस

७ - काँग्रेस

६ - भाजप

२ - शिवसेना

३ - सातारा विकास आघाडी

३ - कऱ्हाड विकास आघाडी

१ - पाटण विकास आघाडी

१ - अपक्ष

Web Title: Ncp Bjp Clash In Satara Zilla Parishad Elections

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top