
शिराळा: वाकुर्डे योजनेच्या पाणीपूजन कार्यक्रमाला मानसिंगराव नाईक यांनी १३ भोंगे लावले आहेत. हे विकासाचे भोंगे आहेत. महाराष्ट्रात हेच विकासाचे भोंगे चालवणे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. भाजप देशात धर्माधर्मांत अंतर निर्माण करणारे भोंगे लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
रेठरे धरण (ता. वाळवा) येथे वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनच्या पाणीपूजनप्रसंगी बोलत होते. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, वाकुर्डे योजनेच्या पाण्याचे डोंगरी भागास वरदान मिळाले आहे. या भागातील लोकांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती होत आहे. हा क्षण माझ्या आयुष्यातील अमूल्य ठेवा आहे. अडीच वर्षांत वाकुर्डे व वारणा प्रकल्पासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ही योजना चालवायला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. या योजनेला वन विभागाचे कमीत कमी अडथळे व्हावेत.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, जयंत पाटील जलसंपदा मंत्री झाल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांनी योजनेच्या पूर्णत्वासाठी घातलेल्या सादेला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या योजनेचे काम पाच वर्षांत पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. या कामासाठी लागेल तो निधी उपलब्ध केला. शिरसी, कोंडाईवाडी, पणुंब्रे येथील कामाचे टेंडर काढले आहे.
माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, शिराळा व वाळवा तालुक्यातील ११० गावांतील ७० हजार एकराला पाणी मिळणार आहे. त्यामुळे या परिसराचा कायापालट होईल. यापुढील काळात पाटबंधारे विभाग व वाकुर्डे बुद्रुक योजना अशी दोन्हीची पाणीपट्टी भरावी लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. जयंतराव, आता वाकुर्डेचे पाणी आणलंय. आता महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी आमची साथ आहे.
स्वागत व प्रास्ताविक हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विराज नाईक, रवींद्र बर्डे, रणधीर नाईक, सुखदेव पाटील, भूषण नाईक, शहाजी पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, सुष्मिता जाधव, देवराज पाटील, संजय पाटील, सुनीता देशमाने, प्रांताधिकारी संपत खिल्लारी, अभियंता हणमंत गुणाले, महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे उपस्थित होते. विजयराव नलवडे यांनी आभार मानले.
भाजपच्या जोखडातून शिवाजीराव सुटले
आग्ऱ्याहून औरंगजेबाच्या जोखडातून शिवाजी महाराज सुटले, त्याप्रमाणेच भाजपच्या जोखडातून हे आमचे शिवाजीराव सुटले असे मंत्री पाटील म्हणताच सर्वत्र हश्या पिकला.
हा त्यांचा बालिशपणा
काहीजण पत्रकार परिषद घेऊन वाकुर्डे योजनेचे पाणी वाळवा तालुक्यात पळवून नेले म्हणतात, यावरून सत्यजित देशमुख यांच्या कार्यकर्त्याचा बालिशपणा दिसून येत असल्याची टीका आमदार नाईक यांनी केली.