esakal | 'जरंडेश्वर जप्तीबाबत शासनानं फेरविचार करावा, अन्यथा रस्त्यावर उतरू'
sakal

बोलून बातमी शोधा

Jarandeshwar Sugar Mil

चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर या साखर कारखान्यावर ईडीने मागील चार दिवसांपूर्वी केलेल्या जप्तीच्या कारवाईमुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले ऊस उत्पादक शेतकरी, कामगार अडचणीत सापडले आहेत.

'जरंडेश्वर जप्तीबाबत शासनानं फेरविचार करावा, अन्यथा रस्त्यावर उतरू'

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : जरंडेश्वर शुगर मिलवर (Jarandeshwar Sugar Mill) ईडीने जप्तीची कारवाई (ED action on Jarandeshwar factory) केल्याने खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. याबाबत तालुका प्रशासनास निवेदन देण्यात आले असून जप्तीबाबत शासनाने फेरविचार करावा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, निवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रा. बंडा गोडसे, जितेंद्र पवार, नंदकुमार मोरे, संदीप मांडवे, बाळासाहेब इंगळे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राजेंद्र कचरे, सागर साळुंखे, शशिकला देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. (NCP Is Aggressive Against The Action Taken By ED On Jarandeshwar Sugar Factory Satara Marathi News)

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनातील माहितीनुसार, चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर या साखर कारखान्यावर (Jarandeshwar Sugar Factory) ईडीने मागील चार दिवसांपूर्वी केलेल्या जप्तीच्या कारवाईमुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले ऊस उत्पादक शेतकरी, कामगार पूर्णपणे अडचणीत सापडले असून सदरचा साखर कारखाना हा बंद न करता पूर्ववत सुरू ठेवावा. जरंडेश्वर साखर कारखान्यावर चार दिवसांपूर्वी ईडीने केलेल्या जप्तीच्या कारवाईने कारखाना बंद राहिल्यास इतर तालुक्यातील, तसेच खटाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतुकदार व कारख्यान्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो जणांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. सदरची कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आली असून खटावसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे.

हेही वाचा: '..तर पडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू'

गेल्या दोन वर्षात पुरेश्या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झाली आहे. यावर्षी खटाव तालुक्यामध्ये सुमारे 9 ते 10 हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे. गेल्या हंगामात फक्त खटाव तालुक्यातून दोन लाख एकोणतीस हजार टन ऊस जरंडेश्वर कारखान्यास गाळपासाठी शेतक-यांनी पाठवला होता. सदर कारखान्याचे व्यवस्थापन हे पारदर्शक व शिस्तबध्द असल्यामुळे सदर कारखान्यास ऊस घालण्यासाठी शेतक-यांमध्ये प्रचंड चढाओढ असते. योग्य वजन, योग्य दर व वेळेत बिल दिल्यामुळे या कारखान्यावर शेतक-यांचा विश्वास वाढलेला आहे. ईडीने ही कार्यवाही थांबविली नाही व कारखाना वेळेवर ऊस गाळप करु शकला नाही. तर यावर्षी ऊस उत्पादक हजारो शेतकरी हे ऊस गाळपापासून वंचित राहतील व त्यांचा ऊस शेतात पडून राहील.

हेही वाचा: वारीबाबत शासनाची कृती दुर्योधन, दुःशासनासारखीच

तसेच ऊस वाहतूक कंत्राटदार, तोडणी कंत्राटदार व कारखाना कर्मचारी या सर्वांवर उपासमारीची वेळ येईल. कोरोना महामारीमुळे शेतकरी अडचणीत असताना जर हा कारखाना चालू राहिला नाही, तर शेतक-यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारखाना वेळेत गाळपासाठी चालू करुन तमाम ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुकदार, तोडणी कामगार व कारखाना कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अन्यथा नाईलाजास्तव रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलनचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी प्रा. एस. पी. देशमुख, बाळासाहेब जाधव, सुनील गोडसे, सचिन माळी, तुकाराम यादव, बाळासाहेब पोळ, ज्ञानेश्वर शिंदे, विजय शिंदे, राजेंद्र चव्हाण, राजकुमार हांगे, ॲड. रोहन जाधव, सुनील नेटके आदींसह शेतकरी उपस्थित होते.

NCP Is Aggressive Against The Action Taken By ED On Jarandeshwar Sugar Factory Satara Marathi News

loading image