
'आमदार महाशय म्हणतात त्यांनी साडेतीन हजार लोकांवर उपचार केलेत.'
'तुम्ही ज्यांचा जोगवा घेऊन फिरताय, त्यांनी मला निर्दोष ठरवलंय'
दहिवडी (सातारा) : जलसंधारण सचिव असताना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून माणमध्ये ७५ कोटी रुपयांचे सिमेंट बंधारे मंजूर केले. पण, त्याचा कधी ढोल पिटला नाही. विरळी खोऱ्याचं हक्काचं टेंभूचं पाणीही विरळीला निश्चितपणे मिळेल आणि ते आम्हीच आणणार. माणचा संपूर्ण पाणीप्रश्न महाविकास आघाडीच (Mahavikas Aghadi Government) सोडवेल, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख (NCP leader Prabhakar Deshmukh) यांनी दिली. पोलिसांच्या (Police) भितीने चालू सभेतून व्यासपीठावरून पळून जाणाऱ्यांनी जामिनाची चिंता करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
विरळी (ता. माण) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळावा व कर्तृत्ववान नागरिकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, माजी सभापती श्रीराम पाटील, संजय जाधव, संजय जगताप, बाळासाहेब काळे, सिध्देश्वर काळेल, संजय खिलारी, रामभाऊ झिमल, विजय जगताप, मधुकर झेडगे, अंकुश गाढवे, शरद काळेल आदी उपस्थित होते. प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘‘या भागाला पाणी न मिळण्याचं पाप या निष्क्रिय आमदारांनी केलंय. त्यांनी पाण्यासाठी प्रतिष्ठा पणाला न लावता पनवेलला भूखंड मिळविण्यासाठी लावल्याने झालेल्या भानगडी तुम्हालाच निस्तराव्या लागणार. तुम्ही ज्यांचा जोगवा घेऊन फिरताय, त्यांनी मला निर्दोष ठरवलंय. त्यामुळे ज्यांनी खंडणी वसूल केली, विनयभंगाची तक्रार ज्यांच्यावर आहे, त्यांनी जामिनासाठी घाबरावं. तुम्ही जातीचं विष पेरण्याचं काम केलं. माणसांना उभं करण्याऐवजी त्यांची डोकी फोडण्याचं काम केलं.
हेही वाचा: RSS यंदा पहिल्यांदाच आयोजित करणार इफ्तार पार्ट्या; बडे नेते होणार सहभागी
आंधळी प्रकरणात ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, त्याची जबाबदारी कोण घेणार? या लबाडाची लबाडी वडूज व दहिवडीतील जनतेनं ओळखली असून आता माण-खटावमधील गावागावांतील जनता ओळखू लागली आहे. शिळ्या कढीला ऊत आणणाऱ्यांनी आपण काचेच्या घरात राहतो, हे लक्षात ठेवावं.’’ राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस व कुकुडवाड गटाचे नेते अभयसिंह जगताप म्हणाले, ‘‘पाणी आंदोलनात या पंचक्रोशीने हिरीरीने भाग घेतला. परंतु, पाणी देताना अन्याय झाला. अजूनही इथली माणसं पाण्यासाठी झगडत आहेत. यापुढील काळात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’ विक्रम शिंगाडे, विश्वनाथ नलवडे, दादासाहेब मडके व प्रशांत वीरकर यांची भाषणे झाली. यावेळी कर्तृत्ववान ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. शरद गोरड यांनी सूत्रसंचालन केले. वैभव गोरड यांनी आभार मानले.
हेही वाचा: Arvind Kejriwal : 'भाजपसारखा मोठा पक्ष गुंडागर्दी करत असेल तर..'
साडेतीन हजार गुणिले पन्नास हजार
शरद पवारांच्या (Sharad Pawar) माध्यमातून वडूज येथे आम्ही जंबो कोविड सेंटर आणले. विविध ठिकाणी चौदा हजार लोकांना कोरोना काळात मोफत औषधोपचार दिले. आमदार महाशय म्हणतात त्यांनी साडेतीन हजार लोकांवर उपचार केले. महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार असताना लोक म्हणतात मायणीत प्रत्येकाकडून ५० हजार घेतले. मग, बघा साडेतीन हजार गुणिले ५० हजार किती रुपये झाले.
Web Title: Ncp Leader Prabhakar Deshmukh Criticizes Jayakumar Gore At Virali Maan Taluka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..