...तरच रुग्ण संख्या कमी होईल; शशिकांत शिंदेंचे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

राजेंद्र वाघ
Friday, 11 September 2020

बेड शिल्लक नसल्याचे हॉस्पिटलकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक हॉस्पिटलची माहिती घेऊन बेड उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलची नावे सामान्य जनतेला उपलब्ध करून द्यावीत, आदी मुद्दे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रात मांडले आहेत.

कोरेगाव (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी बॅंकांसह अन्य संस्थांना व्हेंटिलेटर आणि ऑक्‍सिजनची व्यवस्था करण्याचे, तसेच मदत स्वरूपात रेमेडेसिव्हर औषधे उपलब्ध करून देण्याचे आवाहन करणे गरजेचे असल्याचे लेखी पत्र आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हास्तरावर झालेल्या कोरोनासंदर्भातील बैठकीदरम्यान पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
 
पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह आदींच्या उपस्थितीत कोरोनासंदर्भात बैठक झाली; परंतु आमदार शिंदे सध्या मुंबईमध्ये असल्याने ते या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांचे मुद्दे लेखी स्वरूपात पाठवले आहेत.

आता राज्यातील मराठा समाजाच्या नजरा उदयनराजेंकडे 

त्यात म्हटले आहे, की प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असतानाही कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असून, रुग्णाला वेळेत ऑक्‍सिजन, आयसीयू बेडची सुविधा मिळत नसल्यामुळे मृत्युदर वाढत आहे. वेळीच ऑक्‍सिजन व आयसीयू बेड मिळाल्यास रुग्ण बरे होण्यास मदत होणार आहे. अत्यवस्थ रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात तेवढे ऑक्‍सिजन बेड उपलब्ध नाहीत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी बॅंकांसह अन्य संस्थांना व्हेंटिलेटर अणि ऑक्‍सिजनची व्यवस्था करण्याचे आवाहन करणे गरजेचे आहे. या संस्थांकडून होणाऱ्या पुरवठ्यातून प्रत्येक तालुक्‍यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्राच्या ठिकाणी ऑक्‍सिजनची व्यवस्था केल्यास आणि संबंधित ठिकाणी डॉक्‍टर व नर्सेस उपलब्ध करून दिल्यास वेळेत उपाययोजना होईल आणि सातारा येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होईल.

ढेबेवाडीचे 36 खाटांचे कोविड हॉस्पिटल पहिल्याच दिवशी गॅसवर!

याशिवाय तत्काळ खासगी रुग्णालये अधिगृहीत करून 70 टक्के बेड कोविडसाठी व 30 टक्के बेड अन्य रुग्णांसाठी राखीव ठेवावीत. होम क्वारंटाइन करणे शक्‍य नसेल, अशा ठिकाणी संबंधित तालुक्‍यातील हॉटेल, मंगल कार्यालये अधिगृहीत करून ताब्यात घ्यावीत, तसेच सहकारी साखर कारखाने, सहकारी बॅंकांसह अन्य संस्थांना रेमेडेसिव्हर औषधे उपलब्ध करून देण्याचे आवाहन करावे.

आजही विनोबांचा आश्रम देतो स्वावलंबनाची प्रेरणा 

गरजू रुग्णांना या औषधांचे मोफत वाटप करावे आणि त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे. खासगी हॉस्पिटलचा खर्च सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असल्यामुळे खासगी हॉस्पिटलवरील नियंत्रणासाठी शासनाच्या आदेशानुसार समिती गठित करावी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी होत आहे का? त्याचा फायदा रुग्णांना होत आहे का? याबाबतची माहिती घेणे आवश्‍यक आहे. तसे आज होत नसल्याचे दिसून येत आहे. बेड शिल्लक नसल्याचे हॉस्पिटलकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक हॉस्पिटलची माहिती घेऊन बेड उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलची नावे सामान्य जनतेला उपलब्ध करून द्यावीत, असे मुद्दे आमदार शिंदे यांनी मांडले आहेत.

सावधान... तुमच्या फेसबुकवरून अश्लील चित्रे पोस्ट होण्याचा धोका! कशी घ्याल काळजी?

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Shashikant Shinde Letter To Collector Satara News