
निवडणुकीत माजी आमदार मदन भोसले यांच्या बाजूनं शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनी प्रचारात उडी घेतली होती.
किसन वीर निवडणुकीत शिवसेनेच्या आमदाराची जादू चाललीच नाही
सातारा : किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Kisan Veer Sugar Factory Election) माजी आमदार मदन भोसले (Madan Bhosle) यांच्या बाजूनं कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी प्रचारात उडी घेतली होती. त्यांनी झोकून देऊन प्रचार करूनही राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांच्या करिष्म्यापुढे महेश शिंदेंची जादू चालली नाही. कोरेगावातही मकरंद पाटील व नितीन पाटील (Nitin Patil) यांच्या पॅनेलला साडे तीन ते चार हजारांचे मताधिक्क्य कायम ठेवलं आहे.
किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ६९ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. आज वाई एमआयडीसीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. एकुण १५४ मतदान केंद्रांपैकी पहिल्या टप्प्यात ७७ मतदान केंद्रांची मतमोजणी करण्यात आली. या पहिल्या फेरीतील मतमोजणीत आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलने राखीवच्या तीन व महिला दोन तसेच पाच गटातही आघाडी घेतली होती. साधारणपणे पाच ते आठ हजारांचे मताधिक्य राहिले होते.
हेही वाचा: संभाजी भिडेंवर कारवाई झालीच पाहिजे; काय म्हणाले रामदास आठवले?
वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी शेतकरी सभासदांच्या आग्रहाखातर पॅनेल टाकले होते. तर सत्ताधारी माजी आमदार मदन भोसले यांनी किसन वीरचे खासगीकरण रोखण्यासाठी पुन्हा कारखाना ताब्यात देण्याचे आवाहन करत पॅनेल टाकले होते. या निवडणुकीत पाच तालुक्यांतील चार आमदारांनी लक्ष घातले होते. यामध्ये आमदार मकरंद पाटील, महेश शिंदे, शशीकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लक्ष घातले होते. मदन भोसले यांच्या बाजूने कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे प्रचारात सक्रिय सहभागी झाले होते. तर मकरंद पाटील यांच्या बाजूने कोरेगावचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशीकांत शिंदे हे सहभागी झाले होते. खासदार उदयनराजेंनी मात्र, या निवडणुकीपासून अलिप्त राहात सातारा तालुक्यातील त्यांच्या सभासदांना योग्य तो निर्णय घेण्याची सूचना केली होती. तर शिवेंद्रसिंहराजेंनीही राष्ट्रवादीच्याच पॅनेलला साथ देण्याची सूचना सातारा तालुक्यातील मतदारांना केली होती. महत्वाचे म्हणजे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मदन भोसले यांच्यासोबत राहून कारखाना पुन्हा त्यांच्याच ताब्यात राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी कोरेगाव, सातारा, वाई, मेढा, खंडाळा या ठिकाणी झालेल्या प्रचार सभांत सहभागी होऊन शेतकरी सभासदांना मदन भोसले यांना साथ देण्याचे आवाहन केले होते.
हेही वाचा: अभिनेता सोनू सूदनं सुरू केला उसाच्या रसाचा स्टॉल; व्हिडिओ होतोय व्हायरल
त्यामुळे आमदार महेश शिंदे यांची जादू चालेले व मदन भोसले यांचे पॅनेल आघाडी घेईल असे वाटत होते. मात्र, शेतकरी सभासदांच्या तीव्र नाराजीपुढे महेश शिंदे यांची जादू या निवडणुकीत चालली नाही. कोरेगाव तालुक्यात सुद्धा मकरंद पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवारांनी साडे तीन ते चार हजार मतांची आघाडी कायम ठेवली होती. त्यामुळे महेश शिंदेंची जादू चालली नसल्याची प्रक्रिया आता उमटू लागली आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, कोरेगावात महेश शिंदेंना शेतकरी सभासदांनी झिडकारले असून कारखाना वाचविण्यासाठी आम्ही घेतलेल्या भूमिकेला साथ दिल्याचे या निकालावरून दिसून येत आहे.
Web Title: Ncp Mla Makarand Patil Continues To Dominate In Kisan Veer Sugar Factory Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..