इराणमधील कैद भारतीय युवकांना राष्ट्रवादीच्या खासदारांनी साेडविले

सचिन शिंदे
Monday, 5 October 2020

इतर कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर दोघांचे नुकतेच मायदेशात घरी सुखरूप आगमन झाले.

कऱ्हाड : इराण येथे कैदी बनवून ठेवलेल्या मर्चंट नेव्हीतील दोन भारतीय युवकांची तब्बल नऊ महिन्यांनी सुटका झाली. त्यांच्या सुटकेसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. या युवकांसह त्यांच्या कुटुंबीयांनी खासदार पाटील यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
 
शिरवडे येथील आनंदराव पाटील यांचा मुलगा वीरेंद्र व कवठे महांकाळ येथील भरत पाटील हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला होते. वर्षापूर्वी मुंबईच्या एका एजन्सीतर्फे ते लिब्रा नावाच्या जहाजातून कामानिमित्त इराणला गेले. समुद्री हद्दीच्या सुरक्षेवरून इराण सैन्याने त्या जहाजासह काहींना अटक केली. त्यात वीरेंद्र व भरत यांचा समावेश होता. अटकेनंतर त्यांना तेथील बुशर बंदर येथील तुरुंगात बंदिस्त करून ठेवले होते. त्यांच्या जवळचा मोबाईल, पासपोर्ट काढून घेतले. अनपेक्षित कारवाईने युवकांचा घरच्यांशी संपर्क तुटला होता. तुरंगातील एका इराणच्या मित्राला भेटण्यासाठी त्याची बहीण आली होती. तिला थोडे फार उर्दू समजत असल्याने त्या दोन तरुणांशी संवाद साधून तिच्या मोबाईलवरून व्हॉट्‌सऍपद्वारे भारतातील त्यांच्या घरी संदेश पाठवला. त्यामुळे तीन महिन्यांनंतर घटनेची माहिती तरुणांच्या नातेवाईकांना समजली. त्याबाबत स्पष्ट व सखोल माहिती नसल्यामुळे परदेशात अडकलेल्या मुलांना कसे सोडवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता लागून राहिली होती.

धनगरांची फसवणूक नेते की सरकार करते? कार्यकर्त्यांची भावना
 
आनंदराव पाटील यांनी तत्काळ सारंग पाटील यांची भेट घेऊन झालेल्या प्रकारची माहिती सांगितली. सारंग यांनीही ही माहिती खासदार पाटील यांना सांगितली. त्यानंतर खासदारांनी भारताचे पूर्वीचे राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांना सांगून सामाजिक कार्यकर्ते संजय पराशर यांच्या मदतीने पाठपुरावा करून त्या दोघांची सुटका केली. इतर कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर दोघांचे नुकतेच मायदेशात घरी सुखरूप आगमन झाले. घरी पोचल्यानंतर त्यांनी खासदार पाटील आणि सारंग पाटील यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्‍त केले.

Video : सिंघम है, सिंघम है, साहब हमारा सिंघम है कऱ्हाडामध्ये घोषणा दणाणल्या 

माझा मुलगा व त्याच्या मित्राची खासदार श्रीनिवास पाटील यांच्यामुळे सुटका झाली. सारंग पाटील यांचे सहकार्य लाभल्याने ते सुखरूप घरी परतले. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत अशी भावना शिरवडे येथील आनंदराव पाटील यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP played Vital Role To Release Two Indian Youth From Iran Satara News